भांबार्डेचा ताजमहाल - १५ फेब्रुवरी २०१५



भारत-पाकिस्तान मॅचने सगळे वातावरण क्रिकेटमय बनवून टाकले होते. आम्ही मात्र  भांबार्डेचा ताजमहल (नवरा-नवरी-करवली) पहायला १४ तारखेला रात्रीच निघालो. जुन्या मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि बाईक सुसाट ताणल्या. थंडी कमी झालेली पण त्या वेगाला अंगाला झोंबणारे बोचरे वारे चांगलीच हुडहुडी भरवत होते, तरीही वेगाचे वेड काही
कमी होत नव्हते. रात्री २ वाजता लोणावल्याला पोचल्यावर गरमागरम चहाचा पहिला घोट घशाखाली उतरल्यावर जरा बरे वाटले, सोबतीला वाफाळलेल्या मॅगीचे २-४ घासपण पोटात गेले. जरा तरतरी आली मगमात्र अधिक वेळ न दवडता परत एकदा गाड्या भूशी डॅमच्या दिशेने दामटल्या. तैलबैला फाट्याजवळील चार किलोमीटरची खराब रोडवरील कसरत पार पाडून भांबार्डेत पोचलो तेव्हा ३ वाजले होते. अंधुकश्या प्रकाशात भांबार्डेच्या ताजमहलचे दर्शन घेतले आणि सरपंच्याच्या घराच्या ओसरीतच स्लीपिंगबॅग टाकून पडी मारली. सकाळी साडेसातला उठल्यावर पहिले दर्शन घडले ते हातात क्रिकेटचे सामान घेऊन लगबगीने मैदानकडे जाणारे १५-२० जणांच्या टोळक्याचे. गावातही क्रिकेटचा ज्वर  चांगलाच पसरलेला, गावातील मोकळ्या मैदानावर क्रिकेट मॅचेस आयोजीत केलेल्या आणि ही सगळी टोळधाड तिकडेच लगबगिने निघालेली. आम्हीदेखील बॅगा भरून नाष्टा कुठे मिळेल याचा शोध घ्यायला निघालो. 'पुढे एका बंगल्याबाहेर चहा व वडापाव मिळेल अशी पाटी नुकतीच लावलीय तिकडे बघा अथवा गावात दुकान आहे तिकडे काहीतरी मिळेल' गावातल्या एका मामांकडून माहिती मिळाली व आम्ही बंगला गाठला. बंगल्याच्या आवारातच एक छोटेसे दुकान होते, तिकडेच चहा पोहे सांगीतले. खरेतर किमान २ प्लेट तरी रेमटवण्याच्या तयारीत आम्ही बसलेलो, पण समोर आलेल्या गरमागरम पोह्यांचा पहिला घास तोंडात गेल्यावरच कळले की २-४ तेलांची भेसळ करुन पोहे बनवलेत. त्यामुळे पहिलीच प्लेट कशीबशी संपवली वरती गारढोण चहा घशात ओतला व पुढे निघालो. गावातील शाळेकडून उजवीकडे गेल्यावर पुढे एका घरापाशी गाड्या लावल्या, नको असलेले सगळे सामान एका रिकाम्या पींपात टाकले आणि घरातील मावशींनी सांगीतलेल्या वाटेने निघालो. खरेतर आम्ही फक़्त क्लायबींग पॅच बघायला जाणार होतो पण जमलेच तर क्लायबींगपण करू म्हणून सगळे सामानपण बरोबर घेतलेले. जड बॅगा खांद्यावर टाकून निघालो, वरच्या खिंडीत पोहचायला तासभरपण नाही लागणार असा आमचा गैरसमज लवकरच दूर झाला. खडी चढण आणि पायाखालील भुसभुशीत रेती चांगलीच दमछाक करत होती. कसेबसे धापा टाकत खिंडीत पोचलो आणि पोह्यतील तेलाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. भवतालील जग गरगर फिरू लागल्याचे भांग न पिताही जाणवू लागले. तीनपैकी दोन विकेट तिथेच पडलेल्या, हे कमी की काय म्हणून आपण चुकीच्या खिंडीत आलो आहोत हा साक्षात्कारपण झाला. आजुबाजूला शोध घेऊनही पलिकडच्या खिंडीत जाणारी वाट न मिळ्याल्याने परत निम्मे अंतर खाली उतरून जावे लागणार हे कळाल्यावर उरले-सुरले अवसानही गळून पडले. त्यातूनच डोक्यावर तळपणारे सूर्यनारायण आगामी उन्हाळ्याची जाणीव करुन देत होते. अखेरीस थोडा आडोसा शोधून विश्रांतीसाठी थांबलो. खाली गावात चाललेला क्रिकेटचा सामना रंगात आलेला. बेंबिच्या देठापासून करण्यावर मोठमोठ्याने ओरडण्याऱ्या कमेंटेटरचा आवाज वरतीही स्पष्ट ऐकू येत होता. २-२ ओव्हरच्या मॅच, त्यातही वादावादी झालीकी दंड म्हणून २-४ बॉल कमी टाकायला भेटणारमग त्यातूनच उद्भवणारी अजुन वादावादी शेवटी 'पंचांशी वाद संघ बाद' घोषित केलेकी शांत ह्यायची. त्यातूनच कोणीतरी दादा येऊन मैदानाच्या मधीच आपली गाडी लावायचा, मग त्याने गाडी बाजूला घ्यावी म्हणून चाललेल्या विनावण्या. यमक जुळवत 'रन झालेत बारा आणि सोसाटयाचा सुटलाय वारा' अशी भन्नाट कमेंटरी आमची औटघटकेची करमणूक करत होती. थोडा आराम केल्यावर जरा बरे वाटू लागले, मग परत एकदा खाली उतरून पलिकडच्या खिंडीत गेलो. एका बाजूला साधारण २५० फुट असा रॉकपॅच होता. पण जो क्लायबींग पॅच आहे असे फोटोत बघून आलेलो तिकडेतर एकपण बोल्ट दिसेना, मग थोडासा वळसा मारून मधून कुठे रुट आहेका याचा शोध घेतला, पण कुठेच काही दिसेना. दुसऱ्या बाजूस असलेल्या ३० फुट कड्यावरपण बोल्ट दिसेना. एव्हाना उन्हामुळे रॉकपण बराच तापलेला आणि सोबतीचे पाणीपण संपत आलेले. म्हणून पलिकडील खिंड गाठणेपण शक्य नव्हते. मग थोडा आराम करुन परतीची वाट धरली. खाली आल्यावर परत एकदा सगळे सामान बॅगेत भरले, सोबत आणलेली बिस्किटे आणि गोळ्या घरातील लहान मुलांना दिल्या व अनायसेच मिळालेले थंडगार दूध पिले. घरची वाट धरली पण अर्धवट राहिलेल्या क्लायबींगची हुरहुर मात्र तशीच मागे राहिली. परत एकदा पूर्ण तयारीनीशी पुढील भेट लवकरच होईल.


सागर

No comments:

Post a Comment