आठवणी


कधी तरी एखाद्या जुन्या जखमेचा व्रण अचानक डोळ्यांसमोर येतो. मग बरी झालेली जखमच पुन्हा एकदा नव्याने चिघळते व सोबत सगळ्या जुन्या आठवणी परत एकदा ताज्या होतात. मग आठवते 'ती', एकटीच कशी येईल...सोबत आणते तिच्या संगतीत घालवलेल्या सुखद क्षणांच्या असंख्य आठवणी. ते धुवांधार पावसात बेधुंद होउन भिजणे, समोरील थंडगार होणारी कॉफ़ी विसरून एकमेकांच्या डोळ्यात पहात बसणे, गप्पा मारत जागवलेल्या अगणित रात्रि, तर कधी हातात हात घेउन सागरकिनारी घालवलेले नि:शब्द क्षण. माहित असते पुढे जाऊन होणारी ताटातूट अटळ आहे, म्हणुनच सोबतीचा क्षण अन् क्षण जगण्यासाठी चालवलेली केविलवाणी धडपड. बाहेर कोसळणारा पाऊस व मनातील आठवणींचा कोलाहल कितीही बांध घातला तरीही आवारला जात नाही. मग डोळ्यातुन पाझरणाऱ्या आसवांना मुक्तपणे वाट करून दिली जाते. 'एक जाम...उसके नाम' म्हणतच 'पेग' भरला जातो. त्याने आठवणी अजुनच उफाळून येणार असतात, पण मदत होणार असते ती फ़क्त बाहेरील दुनियेचा विसर पडायला. कधी ओसरूच नये अशी वाटणारी ही धुंद परत एकदा जुन्या काळात घेउन जाते व परत त्या आठवणीतच स्वतःला गुरफटून घेतो.

सागर मेहता

No comments:

Post a Comment