आजोबा किल्ला - २८ सप्टेंबर २०१४


आजोबा किल्ला करून २ महीने झाले पण लिखाणास मुहूर्त काही सापडत नव्हता. खरं तर 'एक से बढकर एक' अनुभव आलेले. जंगलात कोल्होबांनी दिलेले दर्शन, पुढे जाऊन एका नदीपाशी गुडुप झालेला रस्ता, आजूबाजूला घनदाट जंगल, रात्रीचा गच्च काळोख व त्यात भर टाकणारी रातकिड्यांची किररर्र अशी किरकिर. परत फिरून गावात आल्यावर काहीतरी हादडावे, म्हणून शोध घेताना सामोरी आले ते नदीतल्या खेकडयांचे कालवण व तांदळाच्या गरमागरम भाकरीची मेजवानी. वर्षातून काही दिवस भौतिक जगातील सर्व व्याप बाजूला सारून आयुष्य जगण्यासाठी आलेले रुपवेल काका. काटेरी झुडपातुन वाट काढत किल्ला चढणे, शेवटच्या कातळ कड्यावर कसाबसा तोल सावरत चढणे, पुढे जाऊन वाट चुकल्यावर खाली खोल दरी दिसत असूनही १५ फुट खाली असलेल्या निमुळत्या जागेवर मारलेली उडी, बुटांनी आ वासल्यावर रुमालाने गप्प केलेले त्यांचे तोंड. आजोबावरून दिसणारे सह्याद्रितिल रथी-महारथी असे 'अलंग, कुलंग, मदन, कळसुबाई, रतनगड, घनचक्कर, मुडा, कोंबडा, नाफ्ता, हरिश्चंद्रगड' व खाली दूरवर पसरलेली गुहिरेची वाट. आजोबा उतरताना धबधब्याच्या वाटेवर झालेली घसरगुंडी, ओढ्यात दिसलेले असंख्य पाणसर्प. अशा अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. कधी वेळ मिळाला तर सविस्तरपणे लिहिनही, तो पर्यंत तरी जुन्या आठवणींना उजाळा देत इथेच थांबतो.

सागर मेहता

No comments:

Post a Comment