पावसाळ्यातील थरार


थोडेसे आडवाटांवर भटकायला लागल्यावर अजस्त्रकड्याच्या उदरात दडलेली लेणी भेटतात आणि अजून अशी किती अदभुत रहस्य या सह्याद्रीच्या उदरात दडून राहिलीयेत याचा विचार करायला भाग पडते. 

तब्बल एक महिना सक्तीची विश्रांती झाली आणि परत एकदा वेध लागले ते ट्रेकचे. कुठे जायचे? यावर चर्चासत्र सुरु झाली आणि 'या विकेंडला सगळीकडे कुत्र्यासारखा पाऊस आहे व कुत्र्यागत काम आहे रे' असे बोल ऐकू येऊ लागले. एरवी वाढत जाणाऱ्या भारताच्या लोकसंख्येला ट्रेकचा विषय निघाला कि गळती लागते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे, यावेळेसही तसेच झाले. अखेरीस 'इन-मीन-तीन' जण तयार झाले आणि 'तीन तिघाड काम बिघाड' न होता रात्री उशीरा प्लॅन पक्का झाला.

कधीनव्हे ते गजर वाजाण्याआधीच जाग आली ते बाहेर पडत असलेल्या पावसाच्या आवाजाने. कॉफीचा वाफाळता कप घेऊन बाल्कनीत आलो आणि 'कुत्र्यासारखा पाऊस' म्हणजे नक्की काय हे उमगले. ठरल्या प्लॅनवर पाणी फिरण्याआधी पटापट आवरून बाहेर पडलो. सईला वाटेत पीक केले आणि हायवे गाठला. पावसाचा मारा तर अखंड चालूच होता. टोलनाक्याला तिसरा भिडू 'अभिजीत' पावसाचा आनंद लुटत आमची वाट पहात थांबलेला. चला त्रिकुट तर पूर्ण झालेले. हायवे सोडला आणि पावसानेही जराशी उघडीप घेतली, मग गरमागरम चहा बरोबर अंगातही जराशी उब भरून घेतली. 'आधी पोटोबा मग विठोबा' म्हणत मिसळही पोटात ढकलली. आता आम्ही आडवाटांवरील कातळाच्या उदरात दडलेली लेणी बघण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालेलो.
गावात गाड्या लावल्या आणि डोकी दुकानात जमा केली. गावमागील मंदिराजवळ असलेल्या वीरगळ बघितल्या आणि मागील जंगलात शिरलो. घनदाट जंगलातील समाधी चौथऱ्यापाशी जरासा विसावा घेतला आणि पुढे निघालो. आम्ही पूर्णपणे कोरडे होणार नाही याची काळजी पाऊस घेतच होता. कातळात खोदलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचलो आणि त्यावरून वाहणारे पाणी आणि पायऱ्यांवरचे शेवाळे बघून मनात शंकेची पाल चुकचुकली. जवळच असलेल्या शिवलिंगावर जिथे बारा महिने पाण्याचा थेंब अभिषेक घालत असतो तिथे आता पाण्याची अखंड धार लागलेली. आलोच आहोत तर एक प्रयत्न करून बघू म्हणून चढाईला सुरुवात केली. शेवाळ्यातही 'ऍक्शन ट्रेकिंग' बुटांना मिळत असलेली ग्रीप बघून जरासे हायसे वाटले. प्रत्येक पायरीवर विचारपूर्वक पाय ठेवत वरती चढत होतो. मध्येच एखादी तुटलेली पायरी आम्हाला थांबण्यास भाग पाडत होती. मग कुठे एखादी भेग किंवा खोबणी शोधत खाली न बघता वर सरकावे लागे. असे करत निम्मा टप्पा पार पडला आणि एका कतळकड्यापाशी येऊन वाट हरवली. वरून धबधब्याचा अखंड प्रवाह वहात होता तिकडून चढून जाणे तर अशक्यच होते. थोडा शोध घेतला तर बाजूच्या झाडात दडलेली वाट दिसली. जेमतेम एक पाऊल बसेल अशी साधारण आठ फुटांची आडवी वाट, त्यावर साचलेले शेवाळे आणि त्यात भर म्हणून वरून वाहणारे अखंड पाणी. हाताला आधारासाठी काहीच मिळेना, जरासा पाय घसरला तर धबधब्यासोबत वाहत जाऊन जलसमाधी मिळणार हे नक्की. पलीकडे दिसणाऱ्या पायऱ्या बघत तो टप्पा सुखरूपपणे पार पडल्यावर जरासे हायसे वाटले.
एका अरुंद टप्प्यावर उभा असलेला 'अभिजीत'




वरती बघितल्यावर अजून निम्मा टप्पा बाकी आहे याची जाणीव झाली, पण एक दोन अवघड ठिकाणी पायऱ्यांवर असलेल्या खोबण्या आधार देत चढाईचे काम सोप्पे करत होत्या. वरती चढताना खालील बाजूस दिसणारे जंगल सोयीस्कररीत्या दुर्लक्षित केले तरीही 'उतरताना काय?' हा प्रश्न सारखा डोक्यात फिरत होता. 
खाली दिसणारे जंगल आणि पायऱ्यांवरून वाहणारा अखंड जलप्रवाह

अखेरीस पायऱ्या संपल्या व पुढचा पंचवीस फुटांचा पॅच ओल्या गवतावर तोल सावरतच पार केला आणि सुटकेचा निश्वास सोडला. आतामात्र  एकीकडे कातळकडा आणि दुसऱ्या बाजूस दरी असूनही पायाखाली राजमार्ग होता त्यामुळे आता वाटचाल सुसह्य झालेली. वाटेत कातळाच्या पोटाशी पाण्यासाठी खोदलेली दोन टाकी लागली जी भर पावसाळ्यातही कोरडी होती. पाणी जमा होण्यासाठी पूर्वी जरकाही योजना असेल तर ती आता पूर्णपणे बंद पडलेली. मधूनच पाऊस जराशी विश्रांती घेई आणि धुक्याची चादर बाजूला सारून खाली वसलेले गाव, शेती आणि पलीकडील डोंगररांगा दर्शन देई ते बघतच लेण्यांचे मुख्य दालन गाठले.  
लेण्यांच्या मुख्य दालनातून घेतलेला फोटो
साधारण पन्नास बाय चाळीसचे आयताकृती दालन आणि आतील बाजूस असलेली एक अंधारी खोली पाहिली. शेजारीच असलेल्या मंदिराचे दर्शन घेऊन परत एकदा मुख्य दालनात येऊन विसावलो. बऱ्याच काळानंतर एकत्र ट्रेक करत होतो त्यामुळे गप्पांचे असंख्य विषय होते आणि पहाटे लवकरच घर सोडल्यामुळे सोबतीला होता निवांत वेळ, त्यामुळे गप्पांचा मस्त फड रंगला. मध्येच समोरचे धुके बाजूला सरून खालील गाव व हिरवीगार शेती यांचा सुरेख नजराणा दिसायचा. गावातील मंदिरात रंगलेल्या भजनाचे सूर कानी पडत होते ते ऐकतच सोबत आणलेल्या खाऊने पोटपूजा उरकली आणि परत निघालो. गवतावरील घसरण करत पायऱ्या गाठल्या, कितीही नाही म्हंटले तरीही खाली दिसणारे जंगल आणि पायऱ्यांवरून वाहणारे पाणी बघून डोळे फिरत होते. अखेरीस प्रत्येक पाऊल टाकताना तोल सांभाळत, जिथे गरज वाटेल तिकडे रोपचा आधार घेत खाली उतरत होतो. इतकावेळ सुरु असलेली बडबड बंद झालेली, ‘इथे सांभाळून, इथे शेवाळे आहे जरा जपून’ याशिवाय काहीच शब्द बाहेर पडत नव्हते. प्रत्येक जण “all is well, all is well” असे स्वतःला समजावत आम्ही “3 Idiots” खाली उतरत होतो. सगळ्या कसरतीमुळे वरती चढण्यापेक्षा उतरताना जास्त वेळ लागला पण अखेरीस प्रत्येकजण सुखरूपपणे खाली उतरला. आस्तिक का नास्तिक हे प्रश्न बाजूला सारून शिवशंभोला साष्टांग नमस्कार घालून गावात पोहोचलो.
सकाळी निपचिप पहुडलेले गाव आता चांगलेच जागे झालेले. भजनीमंडळ पूर्णपणे जोषात आलेले आणि एका टेम्पोतून ढोल-ताशे उतरवून त्यांच्या दोऱ्या आवळण्याचे काम चालू होते. इतकी लगबग कशाची म्हणून चौकशी केल्यावर उमगले की ‘ मुंबईतील लोकांना वेळ नसतो म्हणून आज रविवारचे गणपती विसर्जन आहे.’ गावातील विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा अनावर मोह टाळून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत एक चहाचा राउंड झाला आणि जवळच असलेल्या डोंगरावरील मंदिर पाहण्यास निघालो. साधारण अर्ध्यातासाच्या चढाईनंतर मंदिरापाशी पोहोचलो. सकाळपासून ओलेचिंब झालेल्या बुटांना जराबाजुला सारून पायांनाही थोडा मोकळा श्वास दिला. एका छोट्याश्या टेकडीवरील शंकराचे मंदिर बाहेरील बाजूने रंगरंगोटी करून एकदम चकाचक केलेले तरीही आत असलेली गुहेतील शंकराची पिंड फारच सुरेख होती. जवळच मुक्कामी असलेल्या साधुशी थोडावेळ गप्पागोष्टी केल्या आणि परत निघालो.
जय शिवशंभो
पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद, पायऱ्यांवरील थरार, अजस्त्रकड्याच्या उदरात दडलेली लेणी, गावातील विसर्जनाची लगबग आणि गुहेतील शंकराचे मंदिर हे सारे काही अनुभवत एका दिवसाच्या भटकंतीची सांगता झाली होती.

सागर


4 comments:

  1. dolya samorun vahtay chalchitra janu...prawah thambvala paausacha gaarva thoda piu aamhi hi vaachatana halu halu

    ReplyDelete
  2. शब्दगुंफण
    वाह,भारी,एकदम जबरी ट्रेक आहे बे हा,थरारक 😍😍👍👌

    ReplyDelete