एक प्रयत्न - आत्मनिर्भर होण्याचा"आत्मनिर्भर बना" हा संदेश ऐकला आणि आपणही आत्मनिर्भर बनायचे या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली. कोरोनामुळे नोकरीवर टांगती तलवार होतीच, नोकरी गमावली तर पुढे काय? अखेर (वाढलेल्या) पोटापाण्याचा प्रश्न होता. मग आपल्याला काय येते याची यादी बनवायला घेतली. मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत चाललेली यादी बघून आपल्या अंगी इतक्या कलागुणांचा वावर आहे याचा झालेला आनंद बायकोच्या "यापैकी कुठली गोष्ट करून पैसे मिळतील?" प्रश्नाने मावळला. आता काय करायचे? या विचाराने जेवताना दोन घास कमीच गेले, झोपही नीट लागेना. युरेकाSSS आपण भुर्जीपावची गाडी टाकली तर? हा विचार डोकावला. कधीकाळी मित्रांना भुर्जी खाऊ घातल्यावर त्यांनी केलेली स्तुती? आठवली. तसे थोडे कमी कष्टाचे काम, संध्याकाळनंतर सुरू होणार, त्यामुळे दिवस हाताशी, आपल्या भागात चांगली भुर्जी मिळत नसल्याने स्पर्धा कमी..वगैरे अशा अनेक सकारात्मक मुद्द्यांमुळे विचार अजून पक्का होत होता.

एक जुना प्रसंगपण आठवला. एकदा दिवसभर तंगडतोड भटकंती करून रात्री उशीरा स्टेशनला उतरलो. भूक लागलेली, आता यावेळी काय मिळणार विचार करत स्टेशनबाहेर आलो तर मित्र म्हणाला "तू बस जरावेळ इथेच, मी आलोच" आणि जवळच्या एका बोळात गायब झाला. बऱ्याचवेळाने उगवला तो हातात दोन प्लेट भुर्जीपाव घेऊनच. अहाहा!!सुख प्रकार होता एकदम. एका प्लेटने पोट कसे भरणार? म्हणून आता मला पाठवले बोळात. आत जाऊन बघतो तर अजबच प्रकार. एकुलत्या एक गाडीपाशी तोबा गर्दी उसळलेली. त्यात मध्यभागी उभा राहून गर्दीशी लढणारा, बनियनवर असणारा एक सावळासा ढेरपोट्या गृहस्थ पूर्णपणे घामाने थबथबलेला. ऑर्डर घेणे, हिशोब ठेवणे, कुणाला काय हवे-नको ते पाहणे आणि तितक्याच शिताफीने भुर्जी बनवणे, यासगळ्या गोष्टी तो इतक्या बेमालूमपणे मिसळत होता की भुर्जीला नक्की चव कशामुळे येते हा प्रश्न पडावा...असो...आपणमात्र एकदम "हायजीनिक" भुर्जी द्यायची. उद्या सकाळीच भुर्जी बनवून एकदा हातसाफ करून घेऊ असे ठरवले. नाव काय ठेवायचे? पाटीवर "आमची इतरत्र शाखा नाही" याशिवाय अजून काय लिहायचे? वगैरे विचार करतच झोप कधी लागली कळलेच नाही.

सकाळी जरा उशीरानेच जाग आली, भुर्जी बनवण्याचा निर्णय ठाम होता. आमच्या वादातीत कौशल्यामुळे स्वयंपाकघरातील प्रवेश तसा निषिद्धच होता. त्यामुळे स्वयंपाकघरात प्रवेश कधी मिळतो याची वाट बघत चहा पीत वृत्तपत्रात डोके खुपसले. थोड्याचवेळात बायको आवरायला बाहेर पडली आणि मी लगोलग स्वयंपाकघरात दाखल झालो. आता फटाफट काम उरकावे लागणार होते. हल्ली घरूनच काम करत असल्यामुळे भांडी लावायची कामगिरी अगदी यशस्वीपणे पार पाडत होतो. त्यामुळे कुठले भांडे कुठे आहे, हे इतके पक्के ठाऊक होते की भांडणाच्या वेळेस कुठली ट्रॉली उघडली जात आहे, त्यावरून आपल्या दिशेने आत्ता कुठले भांडे येऊ शकते, याचा अंदाज घेऊन पुढीलवाक्य काय बोलावे इतका समंजसपणा अंगी आलेला. म्हणून वेळ न दवडता एक पॅन घेऊन गॅसवर ठेवला आणि त्यात तेल टाकले. दुसरीकडे कांदा आणि टोमॅटो चिरायला घेतले. घरून काम करण्याचा परीणाम म्हणजे कानांवर होत असलेले 'मास्तर शेफ'चे संस्कार. त्यामुळे ते जसे इकडे-तिकडे बघत कांदा चिरतात तसा प्रयोग करायला गेलो आणि राजांनी खानाची बोटे एकाच वारात कशी कापली याचे छोटेसे प्रात्यक्षिक झाले. इतरवेळी या गोष्टीवरून आकांडतांडव झाले असते पण आत्ता यात फक्त माझाच हात असल्यामुळे गपगुमान पाण्याखाली हात धुवून हळद लावली आणि कामाला लागलो. तेल तापलेले त्यात कांदा मस्त परतून घेतला, टोमॅटो, अंडी, मसाला वगैरे टाकून मस्त भुर्जी तयार झाली. आधीच झालेला पसारा बघून शेफ जसे 'टॉस' करतात तसे करायचा मोह आवरता घेतला. भुर्जीच्या वासावरूनच एकदम फक्कड बनली आहे हे कळले. मस्तपैकी एका डिशमध्ये काढून त्यावर कोथिंबीर टाकून सजावट पूर्ण केली. चला आत्मनिर्भर होण्याचे पाहिले पाऊल यशस्वीपणे पडल्याने अपार आनंद झालेला. डिश घेऊन डायनिंग टेबल जवळ आलो आणि...अरे देवाSSS...घात झाला...कढईतून हळूच बाहेर डोकावणाऱ्या पिवळ्याधम्मक कांदापोह्यांनी माझ्याकडे बघून हसायला सुरुवात केली, मीदेखील त्यांना खाऊ का गिळू नजरेने पाहिले. आता नाश्त्यासाठी आधीच तयार असलेले पोहे, त्यात मी घातलेला भुर्जीचा घाट, झालेला पसारा..इत्यादी पाहूनच पुढे काय वाढून ठेवलय याचा अंदाज आला. तर मी काय म्हणत होतो , पोह्यांवर जसे शेव वगैरे टाकून देतात तसे यावेळेस पोह्यांवर भुर्जी टाकून माझा "दाखवण्याचा" कार्येक्रम उरकून घेतो आणि पुढे जाऊन भुर्जीची गाडी टाकली की तुम्हाला कळवतो. तेव्हा नक्की या, यायलाच पाहीजे, न येऊन कसं चालेल,नक्की या, किंबहुना मी तर म्हणतो आलंच पाहिजे.

सागर
एक काल्पनिक कथा, यातील कुठल्याही व्यक्ती किंवा प्रसंगाशी समानता आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

पावसाळ्यातील थरार


थोडेसे आडवाटांवर भटकायला लागल्यावर अजस्त्रकड्याच्या उदरात दडलेली लेणी भेटतात आणि अजून अशी किती अदभुत रहस्य या सह्याद्रीच्या उदरात दडून राहिलीयेत याचा विचार करायला भाग पडते. 

तब्बल एक महिना सक्तीची विश्रांती झाली आणि परत एकदा वेध लागले ते ट्रेकचे. कुठे जायचे? यावर चर्चासत्र सुरु झाली आणि 'या विकेंडला सगळीकडे कुत्र्यासारखा पाऊस आहे व कुत्र्यागत काम आहे रे' असे बोल ऐकू येऊ लागले. एरवी वाढत जाणाऱ्या भारताच्या लोकसंख्येला ट्रेकचा विषय निघाला कि गळती लागते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे, यावेळेसही तसेच झाले. अखेरीस 'इन-मीन-तीन' जण तयार झाले आणि 'तीन तिघाड काम बिघाड' न होता रात्री उशीरा प्लॅन पक्का झाला.

वाघ्याआजवर रायरेश्वरला अनेकदा भेट दिलेली, पण दरवेळेस मामांकडे पोटपूजा उरकून पठारावर भटकायला निघालो कि हे बेनं कुठून प्रकट होते हे देवच जाणे. एखादे झाड दिसो वा मोठा दगड लगेच एखाद्या वाघाप्रमाणे आपली सीमा संरक्षित करण्यासाठी मागचा पाय वर करण्यात अजिबात हयगय न करण्याच्या सवयींमुळेच याचे नाव 'वाघ्या' ठेवले, पण दिल्या हाकेला याने आजवर कधीही दाद न देता कायमच दुर्लक्ष केले.

जंगलवाटा धुंडाळताना – १५ ते १७ एप्रिल २०१६


सूर्योदय

'अरे भन्नाट प्लॅन ठरतोय...येणार का? फक्त शुक्रवारची सुट्टी काढायला लागेल...बघ जमत असेल तर सांग...'. लगेच काही प्लॅन न ठरलेल्या सुट्टयांपैकी एका सुट्टीची कोणात्याही नातेवाईकाला आजारी न पाडता आहुती दिली आणि होकार कळवला. गुगल अर्थवरील घनदाट हिरवेगार जंगल ऐन उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देत होते. नेहमीच्या डोंगरवाटा सोडून जरा आडवळणावरची जंगल भटकंती नक्कीच सुखावह ठरणार याची चाहूल नकाशा बघूनच आली.