भांबार्डेचा ताजमहाल - १५ फेब्रुवरी २०१५



भारत-पाकिस्तान मॅचने सगळे वातावरण क्रिकेटमय बनवून टाकले होते. आम्ही मात्र  भांबार्डेचा ताजमहल (नवरा-नवरी-करवली) पहायला १४ तारखेला रात्रीच निघालो. जुन्या मुंबई-पुणे हायवेला लागलो आणि बाईक सुसाट ताणल्या. थंडी कमी झालेली पण त्या वेगाला अंगाला झोंबणारे बोचरे वारे चांगलीच हुडहुडी भरवत होते, तरीही वेगाचे वेड काही

सिंहगड - ८ फेब्रुवारी २०१५


रविवार सकाळी सिंहगड म्हणजे अनेक हवशे-नवशे लोकांची जणु झुंबडच असते. पंढरीच्या वारीप्रमाणे दर रविवारी न चुकता येणारे, कुणी फक्त फोटु-फोटु खेळायला आलेले, कुणी फिटनेससाठी अवजड बोचकी खांद्यावर बाळगत चालणारे, तर कुणी रमत-गमत गप्पा-गोष्टी करत चालणारे. इथे पहिल्या पाच मिनिटांत 'आता थोडे थांबुयात' म्हणणारे पण

घाटवाटा - उपांड्याघाट ते मढेघाट १४ डिसेंबर २०१४



शुक्रवारी सकळीच आकाशात काळया ढगांचे पुंजके जमु लागले. डिसेंबर महिन्यातील भरदुपार अंधारून आली आणि दुपारच्या हलक्याश्या सरीने वरुणराजाच्या  अवकाळी आगमनाची चाहूल दिली. संध्याकाळी तर बळीराजाने थैमान मांडले होते. त्यामुळे राजगड ते तोरणा बेत पण रद्द झाला. रविवारी सकाळी उठून तोरणा तरी करावा असा विचार चालूच होता तेवढ्यात फोन खणखणला 'उपांड्याघाट बघायला चाललोय, फक्त ४ जणच जाउन दुपारपर्यंत परत येऊ, तू येणार का?'. बऱ्याच दिवसापासून वर्षांपासून या घाटवाटा करायचा विचार चालू होता, म्हणून अचानक चालून आलेली संधी कशी चुकवणार? क्षणार्धात होकार कळवला.
रविवारी सकाळी ६ वाजता निघणार होतो पण चारचे आठजण झालेले त्यामुळे वाट पाहण्यात एक तास खर्ची पडला. सरतेशेवटी 'विनायक, राहुल, मंदार, संजय, गणेश, विराट, ऐश्वर्या आणि मी' असे ८ जण सकाळी ७ वाजता सिंहगड रोडवरून निघालो. पाबेघाटात ढग व धुक्याचा अप्रतिम नजराणा व त्यातूनच डोकेवर काढणारे राजगड व तोरणा असे दृष्य अनुभवले. वेल्हयात नाष्टा करुन पुढे निघालो. केळदखिंड पार करून मढेगाव गाठले. 'गाड्या गावातच लावा, म्हणजे नीट राहतील' हे  गावकऱ्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले (परत आल्यावर कळले की एका गाडीतले पेट्रोल कोणीतरी काढले) व वाट विचारुन गाड्या तशाच पुढे दामटल्या. मढेघाटतील धबधब्याकडे जाताना डावीकडे एका शेडखाली गाड्या लावल्या व उपांड्याघाटाची वाट धरली. खिंडीत पोचल्यावर दिसणारे दृश्य लाजवाबच होते. डावीकडे दुरवर धुक्यातुन डोकावणारा वरंधाघाट व कैवल्यगड (कावळ्या), खालील बाजूस दिसणारी हिरव्यागर्द झाडित वसलेली गावे तर उजव्याबाजूस दिसणारा मढेघाट व त्या पलिकडिल गाढवकडा. सगळा परिसर न्याहाळतच खाली उतरायला सुरुवात केली. वाट चांगलीच रूळलेली आहे व सोबतीलाच पाण्याची पाइपलाइन त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण तासाभरातच कर्णवाडीत पोचलो. उजवीकडे जाणाऱ्या छोट्याश्या गाडीरोडने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर लागते. त्यापुढिल चार घरे सोडली की उजव्या बाजूला एक पाउलवाट वरती जाताना दिसते. तीच वाट मढे घाटातून वाहणाऱ्या धबधब्याच्या वाटेला मिळते. खरी वाट धबधब्याच्या वाटेच्या डाविकडून वरती जाते पण आम्ही धबधब्याच्या वाटेनेच वरती निघालो व हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचा अनुभव घेतला. वाटेतच जरावेळ विश्रांतीसाठी थांबल्यावर बॅगेतून फळे, ब्रेड, बटर असे जिन्नस बाहेर डोकावु लागले. ते पोटात ढकलुन वरती वाटेतीलच थंडगार पाणी पिले. धबधब्याच्या छोट्याश्या धारेखाली डोके भिजवल्यावर आत्मापण शांत झाला. त्यानंतरची अर्ध्या-पाउण तासाची खडी चढण मात्र चांगलीच दमछाक करणारी होती. सरते शेवटी मढेघाटाच्या माथ्यावर पोचलो. थंडगार वाऱ्याने धबधब्यातील तुषारांचा अंगावर शिडकाव होताच उरलासुरला शिणवटाही दूर झाला. चार तासांच्या छोट्याश्या ट्रेकची सांगता झालेली. गाड्या काढून परतीचा मार्ग धरला परंतु मुसळधार पावसात चिंब भिजत या घाटवाटा अनुभवायची रुखरुख मात्र तशीच मागे राहिली. त्यासाठी आता वर्षभर थांबण्याशीवाय गत्यंतर नाही.


सागर मेहता

बामणोली - ८ नोव्हेंबर २०१४



कोयनेचा अथांग जलसागर, आकाशात टिमटीमणारे तारे, चांदोबाचा शुभ्रधवल प्रकाश, हवेतील बोचरा गारठा, सतरा तंबुच्या वेढयात  मधोमध पेटलेली शेकोटी व सभोवताली सत्तर जणांच्या रिंगणात हमरीतुमरीवर येउन रंगलेली अंताक्षरी, तदनंतर श्री. अरुण लोंढे काकांनी बाजावर (mouth organ) वाजवलेली गाणी, व सोबतच सुरेल आवाजात गायलेली जुनी गाणी. हळूहळू एक-एक मोहरा झोपेच्या स्वाधीन झाल्यावर मागे राहिली एक चौकडी (अपेक्षा,अरुण लोंढे काका,जे.के आणी सागर) . ओळख फक्त काही तासांची, वय, काम सगळेच भिन्न, त्यामुळेच रात्रभर रंगलेला गप्पांचा एक अनोखा फड. पहाट झाल्यावर समोरील डोंगररांगे पल्याड असलेला वासोटा खुणावत होता म्हणून सामानाची बांधाबांध करायला सर्व मंडळी पांगली. पण रात्रीच्या आठवणी मात्र मनात घर करून राहिल्यात त्या कायमच्याच. कधीच न पुसता येणाऱ्या.

सागर

वासोटा - सह्यवेडे ८,९ नोव्हेंबर २०१४



आमचे परममित्र विनायक बेलोसे व प्राची शिंदे ज्यांच्या बरोबर गेली ७-८ वर्ष स्वछंद भटकतोय. त्यांनी भटकंतीची आवड असणार्यांसाठी 'सह्यवेडे' हा ट्रेक ग्रुप सुरु केला. बऱ्याच वेळा ठरवूनपण यांसोबत जाणे जमत नव्हते. शेवटी मुहुर्त लागला तो गेल्या वर्षीच्या हरिश्चंद्रगड मोहिमेचा. तेथेच ओळख झाली ती यांचा तीसरा पार्टनर 'राहुल बुलबुले' याच्याशी आणि अजुन एक अवली कलाकार फ्रेंड लिस्टमधे सामील झाला. त्यानंतर मात्र सोबतीने बऱ्याच गड-वाटा पालथ्या घातल्यात. त्याचबरोबर 'सह्यवेडे' ग्रुपलापण उदंड प्रतिसाद मिळून वेगवेगळया मोहिमा यशस्वी करण्याचा धडाका चालू होता. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच केलेला 'वासोटा' किल्ला.
वयवर्ष ६ ते ८२ सर्व वयोगटातील मिळून ७० हरहुन्नरी कलाकार सामील झाले होते आणि विशेष म्हणजे ज्या उत्साहाने ६ वर्षाचे पोर उड्या मारत गड चढत होते, तोच उत्साह, आनंद, कुतूहल ८२ वर्षाच्या आजोबांच्या चेहर्यावरपण होते. रात्रभर रंगलेला गप्पांचा फड, जुन्या-नवीन गाण्यांनी सजलेली अंताक्षरी, श्री. अरुण लोंढे काकांनी बाजावर (mouth organ) वाजवलेली व सोबतच सुरेल आवाजात गायलेली जुनी गाणी, लुप्त होत चाललेल्या मर्दानी खेळांचे ‘दांडपट्टा व लाठी’ शिवामृत सूर्यवंशीने दाखवलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक, वयाची सत्तरी पार केल्यावर नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करताना आलेल्या अनुभवांचे श्री. अशोक चौबळ यांनी केलेले कथन. सोबतीला वासोट्याच्या घनदाट जंगलवाटा, दूरवर खुणावणारी नागेश्वर, चांगदेव, रसाळ, सुमार, महिपतगडची डोंगररांग, भग्न वाडयाचे गतवैभवाची जाणीव करून देणारे अवशेष, घनदाट जंगलाच्या वेढ्यातुन डोकेवर काढणारा जुना वासोटा व कितीही डोळे विस्फारून पहिले तरी नजरेत न सामावणारा ‘बाबुकडा’.
सगळेच कसे एकदम फक्कड जमून आले. बऱ्याच वर्षांपासून करायचा राहून गेलेला वासोटा ट्रेक 'सह्यवेडे' ट्रेकर्समुळे एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.


सागर मेहता

आजोबा किल्ला - २८ सप्टेंबर २०१४


आजोबा किल्ला करून २ महीने झाले पण लिखाणास मुहूर्त काही सापडत नव्हता. खरं तर 'एक से बढकर एक' अनुभव आलेले. जंगलात कोल्होबांनी दिलेले दर्शन, पुढे जाऊन एका नदीपाशी गुडुप झालेला रस्ता, आजूबाजूला घनदाट जंगल, रात्रीचा गच्च काळोख व त्यात भर टाकणारी रातकिड्यांची किररर्र अशी किरकिर. परत फिरून गावात आल्यावर काहीतरी हादडावे, म्हणून शोध घेताना सामोरी आले ते नदीतल्या खेकडयांचे कालवण व तांदळाच्या गरमागरम भाकरीची मेजवानी. वर्षातून काही दिवस भौतिक जगातील सर्व व्याप बाजूला सारून आयुष्य जगण्यासाठी आलेले रुपवेल काका. काटेरी झुडपातुन वाट काढत किल्ला चढणे, शेवटच्या कातळ कड्यावर कसाबसा तोल सावरत चढणे, पुढे जाऊन वाट चुकल्यावर खाली खोल दरी दिसत असूनही १५ फुट खाली असलेल्या निमुळत्या जागेवर मारलेली उडी, बुटांनी आ वासल्यावर रुमालाने गप्प केलेले त्यांचे तोंड. आजोबावरून दिसणारे सह्याद्रितिल रथी-महारथी असे 'अलंग, कुलंग, मदन, कळसुबाई, रतनगड, घनचक्कर, मुडा, कोंबडा, नाफ्ता, हरिश्चंद्रगड' व खाली दूरवर पसरलेली गुहिरेची वाट. आजोबा उतरताना धबधब्याच्या वाटेवर झालेली घसरगुंडी, ओढ्यात दिसलेले असंख्य पाणसर्प. अशा अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. कधी वेळ मिळाला तर सविस्तरपणे लिहिनही, तो पर्यंत तरी जुन्या आठवणींना उजाळा देत इथेच थांबतो.

सागर मेहता

आठवणी


कधी तरी एखाद्या जुन्या जखमेचा व्रण अचानक डोळ्यांसमोर येतो. मग बरी झालेली जखमच पुन्हा एकदा नव्याने चिघळते व सोबत सगळ्या जुन्या आठवणी परत एकदा ताज्या होतात. मग आठवते 'ती', एकटीच कशी येईल...सोबत आणते तिच्या संगतीत घालवलेल्या सुखद क्षणांच्या असंख्य आठवणी. ते धुवांधार पावसात बेधुंद होउन भिजणे, समोरील थंडगार होणारी कॉफ़ी विसरून एकमेकांच्या डोळ्यात पहात बसणे, गप्पा मारत जागवलेल्या अगणित रात्रि, तर कधी हातात हात घेउन सागरकिनारी घालवलेले नि:शब्द क्षण. माहित असते पुढे जाऊन होणारी ताटातूट अटळ आहे, म्हणुनच सोबतीचा क्षण अन् क्षण जगण्यासाठी चालवलेली केविलवाणी धडपड. बाहेर कोसळणारा पाऊस व मनातील आठवणींचा कोलाहल कितीही बांध घातला तरीही आवारला जात नाही. मग डोळ्यातुन पाझरणाऱ्या आसवांना मुक्तपणे वाट करून दिली जाते. 'एक जाम...उसके नाम' म्हणतच 'पेग' भरला जातो. त्याने आठवणी अजुनच उफाळून येणार असतात, पण मदत होणार असते ती फ़क्त बाहेरील दुनियेचा विसर पडायला. कधी ओसरूच नये अशी वाटणारी ही धुंद परत एकदा जुन्या काळात घेउन जाते व परत त्या आठवणीतच स्वतःला गुरफटून घेतो.

सागर मेहता

दिवाळी


सर्वत्र दिसणारा रंगीबेरंगी आकाशदिव्यांचा लखलखाट, भल्यापहाटे सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नविन कपड्यांची घडी मोडून सर्वात आधी फटाके फोडायला जाण्यासाठी चाललेली धावपळ, मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत देवळात जाणे, 'चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे' अशा बहुरंगी फराळावर सर्व मित्रमंडळीं जमवून यथेच्छ ताव मारणे, जिथे बांधकाम चालू असेल तेथून माती-वीटा पळवुन आणून बनवलेला किल्ला, तो बनवताना सर्वांग चिखलाने माखल्यामुळे बसलेला ओरडा, दिवाळीतील गृहपाठाचा ससेमिरा चुकवून दुपारी रंगलेला पत्यांचा डाव, सुट्टीत सहकुटुंब केलेली एखादी सफर. 
अशा अनेक रम्य आठवणींनी मंतरलेला दिवाळीतील काळ, आता मात्र रोजच्या धावपळीच्या शर्यतीत कुठेतरी हरवून गेलाय. आता फक्त दिसतो तो चकचकीत ऑफिसच्या काचेतुन बाहेरील आकाशदिव्यांचा लखलखाट, पण त्यांचा प्रकाश काही माझ्यापर्यंत पोहचत नाही.

सागर मेहता

एक प्रवास


सभोवताली अस्सिम गर्दी असुनही एकट्यानेच चाललेला ट्रेनचा प्रवास, नशिबानेच मिळालेली खिडकितली जागा, संध्याकाळची उलटून गेलेली कातारवेळ , निरभ्र आकाशात आपल्याबरोबर धावणारी शुभ्र चंद्रकोर, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, बोगद्यातुन जाताना अंगावर उडालेले तुषार, सोबतीला मागील भेटितील आठवणी व कानात गुनगुनणारा सौमित्र. कधीच संपुनये असा वाटणारा प्रवास शेवटी आपले स्टेशन येते व भुतकाळात हरवलेल्या आपल्या मनाला वर्तमानकाळात आणून सोडतो. मागे राहतात त्या फक्त्त आठवणी ज्या पुरून उरणार असतात पुढील प्रवासापर्यंत.

सागर मेहता