जंगलवाटा धुंडाळताना – १५ ते १७ एप्रिल २०१६


सूर्योदय

'अरे भन्नाट प्लॅन ठरतोय...येणार का? फक्त शुक्रवारची सुट्टी काढायला लागेल...बघ जमत असेल तर सांग...'. लगेच काही प्लॅन न ठरलेल्या सुट्टयांपैकी एका सुट्टीची कोणात्याही नातेवाईकाला आजारी न पाडता आहुती दिली आणि होकार कळवला. गुगल अर्थवरील घनदाट हिरवेगार जंगल ऐन उन्हाळ्यात डोळ्यांना गारवा देत होते. नेहमीच्या डोंगरवाटा सोडून जरा आडवळणावरची जंगल भटकंती नक्कीच सुखावह ठरणार याची चाहूल नकाशा बघूनच आली.

आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर संध्याकाळच्या गर्दीत अडकण्याच्या भीतीने सकाळीच सगळ्या सामानाची जमवाजमव करून बॅग भरून झाली. लांबचा पल्ला गाठायचा असल्याने गुरुवारी रात्रीच निघालो. भयंकर उकाड्याने हैराण झाल्यावर बाईकवरील थंडगार वारा सुखावत होता. हायवे सोडून आतल्या बाजूस वळलो तेव्हा पहाटेचे तीन वाजलेले. मुंबईकडून येणारी मंडळी एव्हाना पुण्यात पोहोचलेली. आयते मिळालेली तीन तास सत्कारणी लावावे म्हणून बाजूला असलेल्या एका गॅरेजच्या ओसरीतच पडी मारली. जाग आली ती कानाशी खणखणाऱ्या फोनमुळे. बाकीची मंडळी येऊन मिळाली आणि ट्रेकर्सचा पेटंट नाष्टा असलेली मिसळ हादडून पायथ्याचे गाव गाठले.
तासाभरातच आवराआवर करून बॅगा खांद्यावर चढवल्या आणि गावातील वाटाड्यामागून चालायला सुरुवात केली. गावातून वाटाड्या म्हणून घेतलेले लहान पोर असो अथवा एखादे म्हातारबुवा, ते आपले निवांत जेवल्यावर शतपावली करायला निघाल्यासारखे चालत असतात आणि त्यांच्या त्या वेगाची बरोबरी करायची म्हंटले तरीही आपली त्रेधातिरपीट उडते. या वेळेसचाही अनुभव काही वेगळा नव्हता, अपुरी झोप आणि उन्हाचा झळा त्यात अजूनच भर टाकत होत्या. पण उन्हाळ्यातील भटकंतीतील सुख म्हणजे 'रानमेवा' जांभूळ, करवंद, अळू यांचा आस्वाद घेतच आमची वाटचाल सुरु होती. ओढ्यातील डबक्यात साचून राहिलेले थंडगार पाणी मिळाले आणि लगेच पंगत बसली. पराठे, आम्रखंड, लोणचे यांवर यथेच्छ ताव मारल्यावर डोळ्यांवर आलेली गुंगी आवरणे कठीण झालेले, पण आळस झटकून पुढे जाणे भाग होते. जंगलातील गर्द झाडीचा पट्टा सुरु झाला आणि उन्हाच्या दाहापासून वाचलो.

जंगलवाटा
शेवटचा चढाईचा टप्पा पार पडला. दगडाखालून झिरपणाऱ्या अखंड पाण्याच्या स्रोतातील पाणी भरून घेतले आणि गुहेत स्थिरावलो. वीसजण राहू शकतील अशी निवांत गुहा, पलिकडे थोडी सपाटी आणि गुहेच्या वरती चहुबाजुला पसरलेले बेसॉल्टचे अफाट पठार. अफलातून जागा होती एकदम. 

लाईफलाईन
सारंकाही पाण्यासाठी
गुहा
सर्वप्रथम चहाचे आधण ठेवले, स्पेशल ऍल्युमिनियमच्या किटलीतील फक्कड चहा पिल्यावर तरतरी आली. सोबत वाटाड्या म्हणून आलेले मामांना योग्य ती बिदागी दिली आणि ते गावाकडे परत फिरले.


कटिंग चाय
काहीजणांनी रात्रीच्या अपुऱ्या झोपेची भरपाई करण्यासाठी झाडाच्या सावलीतच पथारी पसरल्या तर उरलेले भटकायला निघाले. अफाट पसरलेला सडा (पठार) नजरेत मावत नव्हता. चहुबाजूनी असलेले घनदाट जंगल, दूरवर दिसणारे धरण आणि त्याच्याबाजूस वसलेली गावे. हा नजारा पाहून परतलो तेव्हा सूर्य पश्चिमेकडे कलू लागलेला. उन्हाच्या दाह कमी होऊन थंडगार वारा वाहू लागला. हाती असलेला वेळ सार्थकी लावावा म्हणून दूरवर दिसणाऱ्या झेंड्याच्या दिशेने निघालो. तत्पूर्वी झाडावर बसलेल्या वानरांच्या टोळीपासून सामानाचा बचाव करावा म्हणून बॅगा आवरून ठेवल्या. दोन्हीबाजूस दगडांची रास रचून राजमार्ग बनवलेला. 

राजमार्ग
ठिकठीकाणी दिसणारी बिबट्याची विष्ठा आणि रानडुकरांनी खोदलेले खड्डे जंगल किती समृद्ध आहे याची जाणीव करून देत होते. गगनात उंच भरारी घेत गरुड आपले भक्ष शोधत घिरट्या घालत होते. बाजूलाच एका छोट्याश्या गुहेत शंकराची पिंड व नंदी विसावलेले. आजूबाजूचा परिसर न्याहाळून झेंड्याकडे निघालो.

गुहेतील मंदिर
झेंड्यापाशी चार पायऱ्या उतरून गेल्यावर खालील गुहेत छानसे मंदिर बनवलेले. ओसरीवर पत्र्याची शेड टाकलेली, खालील जमीन सपाट करून मध्ये एक छोटेसे होमकुंड बनवलेले. राहण्यासाठी उत्तम जागा होती ती. 


गुहेतील मंदिर
दरवर्षी महाशिवरात्रीला एक बाबा पंधरा दिवसांसाठी मुक्कामी येतात अशी माहिती सकाळीच मामांकडून मिळालेली. मंदिर बघून झाल्यावर बाजूच्याच कड्यावरून सूर्यास्ताचे रंग न्याहाळले आणि गुहेकडे परत फिरलो. 


सूर्यास्ताला रंगांची उधळण
सुदैवाने वानरांनी काही धुमाकूळ घातला नव्हता. परत एकदा चहाचा राउंड झाला आणि रात्रीच्या जेवणाच्या तयारीची सुरुवात झाली. ब्युटेनच्या शेगडीवर रटरटणाऱ्या मिसळ बरोबरच गप्पांनाही रंग चढत होता. 
तर्रीदार मिसळ
तर्रीदार मिसळवर ताव मारताना जंगलातून येणारे रानडुक्करांचे आवाज त्यांच्या जवळपासच असल्याची चाहूल देत होता. जेवल्यावर तंबू लावण्याचा कार्येक्रम उरकला. थोडावेळ मधूनच निरभ्र होणाऱ्या अवकाशातील चांदणे बघत गप्पा मारण्यात घालवल्यावर तंबूत जाऊन पडी मारली.

सड्यावरील मुक्काम
आदल्या दिवसाच्या अपुऱ्या झोपेमुळे व दिवसभरातील भटकंतीमुळे रात्री शांत झोप लागली. सकाळी जरा निवांत जाग आली. तंबूतून बाहेर पडून कड्याकडे नजर फिरवली तर पांढरेशुभ्र ढगांची दुलई बाजूला सरून हिरवेगर्द जंगलपण जागे होत होते. साहजिकच पावले तिकडे वळली पण कडा गाठेपर्यंत तब्बल अर्धा तास गेला. तोपर्यंत सगळे ढग पसार झालेले व एक चांगला फोटो हुकलेला. 

सूर्योदयाला ढगांची दुलई बाजूला सारून जागे होणारे जंगल

हिरवे गालिचे
परत फिरलो तर एक ससा सुसाट धाव घेत झाडीत गुडूप झाला. तंबू गाठला आणि चहा व नाष्टा उरकला. आजचा मुक्काम झेंड्याजवळील मंदिरात करायचा होता, पण त्यासाठी जवळपास पाणी कोठे आहे याचा शोध घेणे जरुरी होते. आदल्यादिवशीच मंदिरात पाण्याने भरलेल्या दोन कळश्या बघितलेल्या त्यामुळे पाणी जवळच असणार याची खात्री होती. मंदिर गाठले आणि जवळूनच खाली उतरणाऱ्या वाटेने खाली उतरल्यावर दहा मिनिटातच दगडाखालील जिवंत स्रोतातील पाणी एक छोटासा पाईपचा तुकडा जोडून डबक्यात साठवलेले. नितळ, थंडगार पाणी पोटभर पील्यावर भटकायला मोकळे झालो. 'पराठे, ब्रेड, आम्रखंड, फरसाण' असा नानाविविध पदार्थांची भेसळ करून जेवण उरकले आणि भटकायला निघालो. दोन टिम झाल्या, एक वरती सड्यावर भटकणारा होती तर दुसरी खालील जंगलात. आम्ही खालील जंगलात भटकायला निघालो. पाण्याच्या वाटेवरून जरा खाली उतरल्यावर पायवाट गुडूप झालेली, घनटात रानाचा पट्टा सुरु झाला. एरवी जंगलात फिरणे म्हणजे खुरट्या झुडपाशी झुंजून काट्यांचे नक्षीकाम अंगावर गोंदून घेत भटकंती व्हायची, पण हे रान घनदाट व गगनाला शेंडे टेकवू पाहणाऱ्या झाडांचे होते. त्यामुळेच काटेरी झुडुपांची वर्दळ कमी व कुठेही वाटा बनवण्यासाठी झाडे-वेली तोडाव्या लागत नव्हत्या. सूर्यप्रकाशाचे कवडसे देखील मुश्किलीनेच खाली पोचत अशा जंगलातील निरव शांतता अनुभवत आमची वाटचाल सुरु होती. आवाज होता तो फक्त पायाखाली वाजणाऱ्या पाचोळ्याचा आणि दरीकडून घोंगावत जंगलात शिरणाऱ्या वाऱ्याचा. जंगलातून वाट काढत कडा गाठला आणि समोर होता अप्रतिम नजर. दूरवर असलेले धरण, त्याजवळ वसलेले गाव, एकीकडे सड्यावरून खाली उतरणारा कातळकडा तर दुसरीकडे अफाट पसरलेले जंगल. सगळा नजारा डोळ्यात सामावून घेत थोडावेळ घालवला आणि आता चाहूल लागलेली ती सड्यावरून दिसणाऱ्या सूर्यास्ताची. तो चुकू नये म्हणून परत फिरलो. जंगलात नैसर्गिक कपारीत थोड्या घळी आढळल्या पण कोणताही प्राणी त्यात मुक्कामी नव्हता. सड्यावर आलो आणि पावले पश्चिमेकडे झपझप चालू लागली. हि शेवटची बाजू जी बघायची राहिलेली. दूरवर अजून एक झेंडा आढळून आला. तेथे औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची सुंदर मूर्ती होती. तिचे दर्शन घेऊन पुढे निघालो. बाजूस कड्याजवळ जंगलातील झाडांचे शेंडे येऊन भिडलेले. कधी सरळसोट खाली उतरणारा कडा तर कधी मध्येच भेग पडून तयार झालेली कपार, नानाविविध प्रकार होते. जवळच झाडाच्या शेंड्यावर गरुडाचे घरटे दिसले. 

गरुडाचे घरटे
सारंकाही पाहण्यातच वेळ झपाटीने पुढे सरकत होता. सूर्य पश्चिमेकडे झुकलेला, तांबूस रंगाच्या छटा गगनात उमटू लागलेल्या. खालील गावातील चुलींमधून उमटणाऱ्या धुराची वलये वरती उठू लागलेली, निळाशार डोह, आणि तांबूसवर्ण पटलावर आपल्या गर्दहिरव्या रंगाचा छाप पाडणारे सदाहरीत वन....अदभूत नजारा होता सगळा. पाऊले एका जागी खिळवून ठेवणारा नजारा कॅमेरात बंदिस्त करत सूर्यास्तापर्यंत तेथेच रेंगाळलो. 

सूर्यास्त
अदभूत नजरे कॅमेरात बंदिस्त करण्याचा प्रयत्न
परत फिरून मंदिर गाठले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु झाली. बिरबलाची खिचडी शिजेपर्यंत परत एकदा गप्पांचा फड रंगला. गरमागरम खिचडी, त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबतीला पापड... एकदम फक्कड बेत होता. चांगला आडवा हात मारून तृप्त झालो. 

गरमगरम खिचडी...साजूक तुपाची धार आणि पापड
जेवल्यावर सड्यावर बसून गप्पा मारल्या आणि नंतर मंदिरातच पथाऱ्या पसरून आडवे झालो. थोड्यावेळाने खालील जंगलातच एक लाईट दिसला ' शिकारी असेल का कोणी वनखात्याच्या?' याचा शोध घेण्यासाठी परत एकदा कडा गाठला. तासभर मस्तपैकी भर्राट वारा अनुभवत तर्क लढवले तरी काहीच बोध न झाल्याने परत मंदिरात येऊन ताणून दिली.
पहाटे लवकरच उठलो. अजून एक ग्रुप मंदिरात मुक्कामी आलेला त्यांच्याशी गप्पा मारून परत निघालो तेव्हा दोन दिवसात अनुभवलेले अगणित क्षण मनात साठवलेले आणि मागे उरल्या होत्या त्या फक्त आमच्या पाऊलखुणा.
सागर

14 comments: