काशिद बीच - ३० जानेवारी २०१६



'काशिद बीच'...गेली कित्येक वर्ष अनेकदा ठरवून रद्द झालेला बेत...अखेरीस या वेळेस बहुमताने पास झालेला ठराव...ओसांडून वाहणारा उत्साह...त्यासाठी कधी नव्हे ते प्लॅनिंग ठरवतानाच्या मिटिंगला सगळ्यांनी वेळेत लावलेली हजेरी...एरवी पहाटे सहाच्या शिफ्टला डोळे चोळत रमतगमत हजेरी लावणारी मंडळी यावेळेस पाचच्या ठोक्याला ताजीतवानी होऊन हजर...डाइवर साहेबांचा जरासा जास्त लागलेला डोळा, त्यामुळे वेळेचे बिघडलेले गणित...पहाटेची गुलाबी थंडी सरुन लख्ख उजाडात सुरु झालेला प्रवास...मुळशितील जलसाठ्यातील उरलेले पाणी न्याहाळत सुरु असलेला प्रवास...गाडीत हमरीतुमरीवर येऊन रंगलेल्या गाण्याचा भेंडया...चहाच्या ब्रेकला सुरु झालेला क्लिकक्लिकाट...ईंडीपेंडन्स पॉइंटला खोल दरी, घनदाट जंगल व काळेभिन्नकडे बघुन विस्फारलेले डोळे...पोटातील कावळे कोकलु लागल्यावर मुरुडमधील पाटिल खानावळीची आतुरतेनी पाहिलेली वाट...कोणी सुरमईवर, कोणी चिकन तर उरलेल्यांनी घासफूसवर मारलेला ताव...बसमधे एक पॉवरनॅप काढून गाठलेले काशिद बिच...दावणीला बांधलेली जनावरे  दोर सोडल्यावर मुक्तपणे उधळावित तसे बस थांबल्यावर सगळे चौखुर उधळलेले...कोणी बेफाम लाटा झेलत आकंठ बुडालेले, तर कोणी पाण्यातील वेगवेगळ्या सफारीचा आनंद घेण्यात रंगलेले...तब्बल दोन-अडीच तास पाण्यात धुमाकूळ घातल्यावर मावळत्या दिनकराला नमन करुन सुरु झालेला परतीचा प्रवास...दिवसभराच्या धावपळीने दमल्यावरहि रंगलेला दमशेराजचा खेळ...खोपोलीला उरकलेली पोटपूजा...आणि बिछान्यावर पाठ टेकण्याची वाट पहात बसमध्ये मिटलेले डोळे...ऑफिसमधील टीम सोबत केलेल्या भन्नाट ट्रिपची सांगता।।।

सागर

No comments:

Post a Comment