लोणावळा ते भीमाशंकर (लोभी) २१-२३ ऑगस्ट २०१५



बऱ्याच दिवसांपासून डोक्यात घोळणारा 'लोभी' ट्रेक करायचा ऑगस्टमध्ये नक्की झाले. ब्लॉग, नेटवरील माहिती, मॅप वाचून सगळी माहिती मिळवली. ७ वेळा हा ट्रेक केलेल्या प्रसादला भेटून वाट समजावून घेतली. सगळा प्लॅन तयार झाला, यावेळेस एकटेच जायचे ठरवले, पण एक-एक जण  जोडत जाऊन चार जण झाले आणि परत सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. 
लोभी ठरवता पार बागलाणपर्यंत फेरी मारून झाली. खायचे सगळे सामान आम्ही बघतो म्हणणाऱ्या महिला मंडळाचे 'हो-नाही' सुरु झाले. मग नक्की कोण-कोण येणार आणि कधी निघायचे यावर इतकी खलबतं झाली की डोक्यावर उरलेले थोडेफार काळे केसही हा ट्रेक ठरवतानाच पांढरे होणार असे वाटू लागले. अखेरीस पंकज, सावनी, राहुल आणि मी असे चारजण सकाळी ६.३० वाजतच्या ट्रेनने निघायचे ठरवले. सकाळी ६ वाजता स्टेशनला भेटु म्हणून बंद केलेले चॅट पहाटे सव्वाचारलाच 'उठलात का रे?' म्हणून परत सुरु झाले. रात्रीच्या तास-दोन तासांच्या अपुऱ्या झोपमुळे आलेला गुंगीचा अंमल थंडगार पाण्याच्या पहिला तांब्या डोक्यावर ओतल्यावर खाड़कन उतरला. आवरून पाच वाजता घर सोडले, आता सगळ्यात मोठ्ठा प्रश्न होता तो म्हणजे इतक्या पहाटे स्टेशनला जायला काय मिळणार? पण सकाळी-सकाळी माझेच तोंड आरश्यात पहिल्याने नशीब एकदम बलवत्तर होते. एक कॅब हात न दाखवताच थांबली. बॅग मागे टाकून गप्पा सुरु झाल्या. एकदम चकाचक ठेवलेली गाडी बघुन विचारल्यावर कळले 'साहेब रहायला धायरीतच, शिक्षणाने ऑटोमोबाईल इंजिनियर,रोज उठून सायबाला 'शलाम शाब' करायचा कंटाळा आला म्हणून जॉब सोडुन कॅब घेतली. स्वतःच्या तीन कॅब आहेत आता. दोन पैसे कमी मिळाले तरी सुखी आहे म्हणून खुश होता गडी एकदम.' इथे एक सुट्टी घेण्यासाठी महिनाभर तयारी करुन ट्रेकला निघालेलो मी आणि स्वतःच्याच मनाचा राजा असलेला तो, क्षणभर हेवा वाटला मला त्याचा. माझी बॅग बघुन गप्पा ट्रेकवर घसरल्यावर मीदेखील आपले ज्ञान पाजळले. राजाराम पुलापर्यंत सोडायचे कबुल केलेल्या त्याने दांडेकर पुलावर सोडले. तिकडून धावतपळत स्वारगेट गाठले आणि टमटम पकडून बरोब्बर ६ वाजता स्टेशन. पंकज आणि राहुल भेटल्यावर चहाचे आवर्तन झाले व लोणावळा लोकल पकडली. सावनी पिंपरीला बसणार होती म्हणून तिला फोन आणि मेसेजचा भडिमार सुरु केला.  लोकल पिंपरीवरुन सुटत असताना तिचा  फोन आला. 'कुठे आहात? मी पिंपरी स्टेशन बाहेर आहे अजून'. चुकण्याची सुरुवात लोकल पासूनच झाली. तिने पुढच्या लोकलने लोणावळा गाठेपर्यंत आम्ही 'अन्नपुर्णा' मध्ये तर्रीदार मिसळ व गरमागरम थालीपीठवर आडवा हात मारला. किरकोळ सामानाची खरेदी उरकली आणि साडेनऊ वाजता आमच्या 'चांडाळ चौकडीची' पदयात्रा सुरु झाली.
लोणावळा सोडून राजमाचिच्या रस्त्याला लागलो, तुंगार्ली धरणाच्या बाजूने पुढे गेल्यावर भेटलेल्या शाळकरी पोराला 'राजमाची किती लांब आहे?' विचारल्यावर निर्विकार चेहर्याने त्याने 'सतरा किलोमीटर' उत्तर दिले. आम्ही पहिला मुक्काम कुसूर पठारावर करायचा असे ठरवून निघालेलो, लईच दुरचा पल्ला गाठायचा होता. 'अभी तो पार्टी शुरू हुई है!' म्हणत चालण्याचा वेग वाढवला. हिरवाईने नटलेला परीसर, अधुनमधुन झोडणाऱ्या पावसाच्या सरी, भर्राट वारा, वाटेत भेटणारा एखादा गावकरी सोडला तर निर्जन रस्ता आणि मोबाईलला नसलेली रेंज हे सगळेच सुखावत होते. चालण्यावरुनच दोन ग्रुप पडलेले. राजमाचीकडे जाणाऱ्या Y जंक्शन वरुन उजवीकडे जाणारी वाट पकडून मी आणि राहुलने वळवंड गाठले. हाती असलेला वेळ सार्थकी लावावा म्हणून बॅगेतील कॅमेरा काढून फोटु-फोटु खेळ सुरु झाला. विरगळ, मंदिर, मारुतीचे शिल्प टिपले आणि सर्वजण जमल्यावर केक खाऊन थोडा आराम केला. पावसाची एक जोरदार सर ओसरल्यावर पुढे निघालो. वरवंडमधील शेवटचे घर ओलांडले की एक वाट उजविकडे जाते ती वाट धरली. बुटांना फारच भारी ग्रिप आहे या भ्रमात बिनधास्त चाललेलो तो साफ खोटा ठरला. पाय सररकन् घसरला आणि बुडावर आपटता आपटता केवळ हात टेकले म्हणून वाचलो. त्यानंतर मात्र प्रत्येक पाऊल टाकताना फार विचार करून टाकू लागलो, साहजिकच त्यामुळे वेग फारच मंदावला. कॅनॉल पार करुन जरासे वरती शिरलो आणि अप्रतीम नजारा दिसू लागला. एका हाताला धबधबा, समोर  धुक्यातुन डोकवणार 'मनोरंजन' आणि वाटेवरील रंगीबेरंगी फुले. परत एकदा फोटुसेशन झाले.तुरट-गोड चवीची खजुराची फळे गप्पांसोबत चघळून निघालो. थोडे वरती गेल्यावर ओढ्यापाशी पायाखालील वाट गुडुप झाल्यावर आणि 'लंच ब्रेक' चा ठराव मुकसंमतिने व बहुमताने पास झाला. काही बनवायच्या भानगड़ित न पडता सगळे 'रेडी टू इट' घेतलेले. बॅगा उघडेपर्यंत वाट शोधावी म्हणून जरा पुढे चक्कर मारली. पाच मिनिटातच चांगली मळलेली पायवटा  आडवी आली. उजविकडील झाडित शिरत होती तर डाविकडील जंगलात. आधी पोटोबा उरकावा म्हणून मागे फिरलो आणि बुट काढून पाय पाण्यात सोडुन बसलेल्या चमुत सामील झालो. 'ब्रेड, बटर,साॅस आणि लसुण शेवचे' सॅंडविच रेमटवले. मोजून १० मिनिटांची वामकुक्षी झाल्यावर आवरते घेतले. शोधलेल्या वाटेवरुन डाविकडे जंगलात शिरलो तर थोडे खाली उतरल्यावर वाट गायब. मग कधी काटेरी झाडे तुडवत नव्या वाटा बनवत तर कधी ओढयातील थंडगार पाण्यात बुटं भिजवत तासभर तंगड़तोड़ केली. थोडे मोकळ्यावर आलो व समोर 'ढाक भैरी' दिसल्यावर झालेला आनंद मध्ये आ-वासुन पहुडलेल्या खोल दरीमुळे मावळला. परंपरेनुसार वाट चुकलोय हे ध्यानात यायला फारसा वेळ लागला नाही. परत फिरुन दुसरी वाट शोधण्याशिवाय गत्यंतर नव्हते म्हणून माघारी फिरलो. लिंबुपाणी पिऊन जरा तरतरी येईल म्हणून एक ब्रेक घेतला. सुदैवाने तिकडेच रेंज मिळाल्याने प्रसादला फोन करुन नक्की वाट कुठून आहे हे खात्री करुन घेतले. सावनीने तिथुनच परत जायचा विचार बोलून दाखवल्यावर माघारी जाण्यापेक्षा पुढे जाऊन कोंडेश्वरला जाऊन दुसऱ्या दिवशी जांभिवली मार्गे जाणे जास्त सोईस्कर होते म्हणून कोंडेश्वर गाठायचे ठरवले. जिथुन आम्ही डाविकडे जंगलात शिरलेलो तिकडेच उजविकडे शिरल्यावर छान मळलेली पायवाट मिळाली. या सगळ्या गोंधळात तिन्हीसांज झालेली.आमचा मुक्काम कुसूर पठारावरुन हलुन तासभराच्या अंतरावर असलेल्या कोंडेश्वरला ठरलेला. त्यामुळे तिन्हीसांजेला आसमंतात पसरलेले विविध रंग, उनपावसाचा सुरु असलेला खेळ, धुक्यात लपलेला ढाकभैरी व कळकराय, हिरवाईने नटलेला परिसर, ८०० फुटाचा मांजरसुंब्याचा कातळकड़ा आणि खाली असलेली दरी हे सर्व कॅमेरात टिपण्यात सर्वजण हरवून गेले. अंधार पडुलागल्यावर आवरते घेतले. अनेक ढोरवाटा पालथ्या घालत धड़पडत कोंडेश्वर मंदिर गाठले. बाहेरील बाजूस फ़क्त खांब आणि छप्पर असल्याने वाऱ्या-पावसापासून वाचण्यासाठी आमचा मुक्काम गाभाऱ्यात हलवला. चहा आणि ब्रेडबटर खाऊन नऊ वाजताच स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो. अचानक जाग आली, पहाटेचे ४-४.३० वाजले असतील असे वाटले, घड्याळ्यात बघितले तर ११.३० झालेले. पंकज आणि सावनी जागेच होते. मग गप्पाटप्पा सुरु झाल्या. कुंभकर्णासारखा झोपलेल्या राहुलला उठवण्याचे निष्फळ प्रयन्त करुन झाल्यावर मोबाईलवर गाणी ऐकतच डोळे मिटले.


क्रमशः


सागर

6 comments:

  1. परंपरेनुसार वाट चु...!

    ReplyDelete
    Replies
    1. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे हि....:)

      Delete
  2. इथेही निष्पाप जीवाच्या झोपेवर डोळा !!!

    ReplyDelete
    Replies
    1. म्हणूनच दुसऱ्या दिवशी डासांनी झोपू नाही दिले....:)

      Delete
  3. DADA EKDUM AWDYA .... SUREKH LIHIL AHE RE..

    ReplyDelete