मोहनगड - श्री. जननी देवी मंदिर ६ सेप्टेंबर २०१५



शनिवारी दुपारी निघुन रविवारी संध्याकाळपर्यंत परत असा ट्रेक करायचा बेत ठरला. दोन-चार जणांना 'येणार का?' विचारल्यावर त्यांनी नन्नाचा पाढा गायला. मग अजुन कोणाला विचारण्यापेक्षा 'एकला चलो रे' हेच बरे असे ठरवले. पण जायचे कुठे हा मोठ्ठा प्रश्न होता. प्रसादने 2-3 घाटवाटा किंवा मोहनगड सुचवले. पण शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ कामे उरकण्यात गेला आणि कुठे जायचे याची काहीच माहिती मिळवली नव्हती. मग शनिवारी निघायचे रद्द करुन मस्त झोप काढली. सरतेशेवटी रात्री 'गुगल अर्थ' वर घाटवाटा पालथ्या घालण्यात रात्रीचे २ वाजले. एक-दोन चांगले प्लॅन ठरवले पण #लोभी ट्रेकनंतर पायाला आलेले ब्लिस्टर्स नुकतेच कुठे बरे झालेले, त्यामुळे परत ओले बुट घालुन ८-१० तासांची तंगडतोड नको म्हणून घाटवाटा रद्द झाल्या आणि मोहनगडवर एकमताने शिक्कामोर्तब झाला.

पहाटे पाच वाजल्यापासुन गजर कानापाशी वाजायला सुरुवात झाली. उणेपुरे दोन तासांची अपुरी झोप झालेली त्यामुळे डोळे उघडतच नव्हते. दरवेळेस अजुन फक्त पाचच मिनिट झोपु म्हणुन गजर बंद करायचा आणि परत डोळे मिटायचे हा खेळ सुरु झाला. अखेरीस जाग आली तेव्हा खिडकीतुन लख्ख सुर्यप्रकाश आत डोकावत होता. खडबडून उठलो आणि घड्याळ बघितले तर ७.१५ झालेले. गपगुमान उठून आवरले आणि ८ वाजता घर सोडले. 'नेकलेस पॉइंटला' वेळेेअभावि अवघ्या ५ मिनिटांत फोटोसेशन उरकुन भोर गाठले. मिसळ व चहा पोटात ढकलुन गाडी पुढे दामटली. शिरगाव फाटयावरुन डावीकडील वाट पकडून चार किलोमीटरवर असलेले 'दुर्गाडी' गाव गाठले. शाळेसमोरील झाडाच्या सावलीत गाडी लावली तर छान भजन शिकवण्याचा कार्यक्रम थांबवून 'ह्ये कोण येडं आलंय?' अशा अविर्भावत माझ्याकडे बघायला लागले. हेल्मेटच्या आतील डोके दिसल्यावर माणुसच आहे ही खात्री पटल्यावर बंद पडलेले भजन परत एकदा जोमने सुरु झाले. दोनचार म्हातारी माणसं येऊन माझी 'शाळा' घेतल्यावर 'नीट जारं पोरा' असा सल्ला देऊन निघुन गेली. शिरस्त्राण आणि जर्किन दुकानात जमा केले आणि मोहनगडाची वाट धरली. मागील खिंडीतून सरळ वरती जाणारी खडी वाट पकडून तासभरातच पहिला टप्पा पार केला. हवामानखात्याचा 'मान्सून परतणार' हा अंदाज लगेच खरा ठरवत कडकडित उन पडलेले. शेवटच्या टप्प्यातील जरा उजवीकडे जाणारी पायवाट पकडली. ती थोडी खाली उतरत होती आणि एक बारीकशी वाट डावीकडून वरती जाताना दिसली. काय करावे? असा प्रश्न पडला. घाम सुकेपर्यंत जरा टेकावे म्हणुन १० मिनिटांचा ब्रेक घेतला. खाली उतरण्यापेक्षा वरती जाऊन बघावे म्हणून डावीकडील वाटेने वरती शिरलो. छान रुळलेली पायवाट एक डावीकडे उतरत होती तर समोर वीसफुटाचा एक पॅच दिसत होता. कसाबसा तो चढला, तर पुढे अजुन एक छोटा पॅच. तो पार करुन झाडीतून बाहेर आल्यावर वरती बघितले तर पॅचची रांग दिसत होती. शेवटचा तर जास्तच भयानक दिसत होता. जरा डोके खाजवल्यावर 'वरती मंदिर आहे आणि बायाबापडयापण जातात तर अशी वाट नक्कीच नसणार' हा उजेड टकुर्यात पडला. मागे फिरलो खरा पण आता खाली उतरायचे कसे? वीस फुट खाली उडी मारून पाय मोडून घ्यायचा नव्हता, झाडिमुळे पाय कुठे ठेवावा हेच नीट दिसत नव्हते, शेवटी तोंड फिरवले तर सॅक मागून ढकलु लागली. दोन दगडांच्या फटित मजबुत पकड जमवत खाली दिसणाऱ्या छोट्याश्या जागेत एक पाय टेकला तर तो मुरूम तुटला. हातांची पकड घट्ट होती म्हणून होणारी घसरगुंडी वाचली. परत तसाच वर चढलो व शेजारील मजबुत झाडाला लोंबकाळत खाली उतरलो. आता डावीकडील वाट पकडायची ठरवले. १५ मिनिटांत ती पण झुडुपात हरवली. थोडी पुढे असेल म्हणुन जंगल तुडवायला सुरुवात केली. काटेरी झुडपे आणि भुसभुषित माती पावलागणिक पुढे जाणं अवघड बनवत होते. इतक्यात झाडित कसलीतरी खुसपुस झाली म्हणुन बघितले तर गर्द झाडीत फक्त करडया रंगाचे पाय दिसले. कुठला प्राणी ते नाही कळाले पण आता आपण वाट चुकून दुसऱ्याच्या राज्यात प्रवेश केला आहे आणि ढुंगाणाला पाय लावून पळण्याची वेळ आलीये हे उमगले. पण काटेरी झाडिमुळे तेही शक्य नव्हते, त्यामुळे हाती असलेली एकमेव काठी हा एकच आधार होता. सुदैवाने तिचा वापर करण्याची वेळच आली नाही, कारण जे काही होते ते झुडुपात गुडुप झाले आणि मी माघारी फिरलो. मनाला वाटेल तसे झाडित शिरल्याने परतणे अजुनच मुश्किल झालेले. तब्बल अर्धापाउणतास झगडा केल्यावर परत जिथे पहिला ब्रेक घेतला तिथे पोचलो. तोपर्यंत चांगली वाट म्हणजे जिथे कमितकमी ओरखड्यांची नक्षी अंगावर उमटेल ती इतकी सोप्पी व्याख्या बनलेली, बाकी चढ, उतार, घसारा ह्या सगळया व्याख्या कधीच खात्यात जमा झालेल्या. परत जरा विश्रांती घेतली आणि खाली उतरणाऱ्या वाटेने पुढे जायचे ठरवले. मोजून दहा पावले चालल्यावर दगडावर खुण म्हणून रंगवलेला बाण दिसला. एव्हडि छान वाट सोडुन तासभर केलेला खेळखंडोबा आठवला आणि आता हसावे का रडावे हेच कळेना. वाट सापडल्याच्या आनंदात अर्ध्या तासातच गडमाथा गाठला. सुंदरसे जननी देवीचे मंदिर दिसल्यावर 'पोचलो एकदाचे सुखरूप' म्हणून जो आनंद झाला तो अवर्णनीय होता. मागील बाजूस एक चक्कर मारून परत मंदिरापाशी आलो. बॅग आणि शूज उतरवुन देवीचे दर्शन घेतले. आत एक मस्तपैकी तांब्याचे भांडे भरून थंडगार पाणी ठेवलेले, ते पिल्यावर जीवालापण जरा बरे वाटले. बॅगेतील कॅमेरा काढून आजुबाजुचा परीसर कैद करण्यास सुरुवात केली. कडकडित उन जाउन ढग दाटुन आल्यामुळे बराचसा परीसर धुरकट दिसत होता. तरीही वरंधा, कावळ्यादेवधरचे बॅकवॉटर, रंगीबेरंगी फुले, उनसावल्यांचा खेळ, मंदिरातील शांतता हे सगळे सुखावत होते. थोडावेळ आराम करुन परत निघालो. झपझप वाट उतरत खिंड गाठली आणि आपण मिसळ नंतर काहीच खाल्ले नाहिये याची जाणीव झाली. सणकुन भुक लागलेली पण ब्रेड खायची ईच्छाच नव्हती मग सोबत असलेले चिवड्याचे बकाणे भरून दोन घास पोटात गेल्यावर जरा जास्तच तरतरी आली, ती इतकी की चांगले दोन डोंगर उजवीकडे उतरलो. आता डांबरी रस्त्याने तीन किलोमीटर चालत दुर्गाडी गाठावे लागणार होते. वाट चुकण्याचा 'इजा-बीजा-तीजा' झालेला, 'आलिया भोगासी..' म्हणुन चालयला सुरुवात केली तर सकाळपासून धुक्यात दडून बसलेल्या 'रायरेश्वर-नाखिंदने' दर्शन दिले. इतके महिने चकवा देणारे नाखिंद आज पाहायला तरी मिळाले. दुर्गाडी गाठेपर्यंत सोबत देणारे नाखिंद परत धुक्यात गुडुप झाले. दुकानात ठेवलेले सामान गोळा केले, एक थंडगार सरबत घशाखाली उतरल्यावर परतीची 'ROYAL' सफर सुरु झाली. बऱ्याच महिन्यांनी एकट्यानेच केलेली मनसोक्त भटकंती, एकसे बढ़कर एक आलेले अनुभव, मोहनगडवरुन पाहिलेला नजारा आणि ओझरते का होईना पण नाखिंदचे घडलेले दर्शन हे सगळे सुखावत असले तरीही  शनीवारचा आळस टाळला असता तर एक सुंदर सुर्यास्त व सुर्योदयही बघायला मिळाले असते ही एकच हूरहूर तेवढी लागून राहिली. त्यासाठीतरी पुनर्भेट लवकरच.


सागर

No comments:

Post a Comment