कोथळेचा भैरोबा-सांदण व्हॅली-पेमगिरी(शहागड़) किल्ला १२-१३ सेप्टेंबर २०१५



कोथळेच्या भैरोबाला दंडवत घालुन खाली उतरलो तेव्हा तिन्हीसांज होत आलेली. गाडीजवळ पोहोचलो आणि एक लांडोर मोठ्याने आवाज करत आम्हाला दचकावून जंगलात शिरली. गाडी काढली आणि मुक्कामासाठी घाटगरकडे निघालो. गावागावात साजरा होणारा बैलपोळा रंगात आलेला. सजवलेले बैल मोठ्या दिमाखाने मिरवणुकीत मिरवत होते. आजुबाजुस असलेले घाटमाथे ढगांत हरवत चाललेले. राजूर गाठल्यावर दोन-दोन कप चहा मारला आणि तरतरीत झालो. रात्रीच्या जेवणानंतर गोड हवे म्हणून राजुरचे सुप्रसिद्ध पेढे बांधून घेतले. अंधाराचे साम्राज्य पसरलेले आणि आमची 'जंगल सफारी' सुरु झाली.

पहिले दर्शन दिले ते मुंगुसाने, तर त्यानंतर लगेचच झाडावर बसलेले एक घुबड आमच्याकडे आपले डोळे वटारुन बघत होते. 'मुंगुस दिसलेले शुभ असते, पैसे मिळतात?' आणि 'घुबड दिसलेले अशुभ'. यासगळ्या अंधश्रद्धांमध्ये स्वतःला जखडून न घेता आमची वाटचाल सुरु होती. वाटेत एका घरापाशी एक सर्पमित्र चांगला ५ फुटी जाडजुड साप आपल्या टोपलीत बंदिस्त करत होता. उडदावण्याच्या जरासे अलीकडे एक तरस दिसले. नीट बघावे म्हणून गाडी जरा मागे घेतली तर ते बाजूच्या झाडित पळाले. थोडक्यात हुकले ही चुटपुट फार काळ लागून न राहता थोडे पुढे गेल्यावर लगेच दूसरे दिसले, त्याला मोबाईलमध्ये टिपून पुढे निघालो. दहा वाजत आलेले म्हणून जेवण बनवायचा बेत रद्द करुन जवळच्या एका छोट्याश्या हॉटेलात पिठलं-भाकरी सांगितले.
वाऱ्यामुळे हवेतील गारठा चांगलाच जाणवत होता. गरमागरम पिठलं, खुशखुशीत भाकरी, हिरव्या मिर्चिचा झंझणित ठेचा व सोबतिला 'शाही' कांदा..'अहाहा बात बन गई'. टेबल-खुर्ची बाजूला सारुन मस्तपैकी चवथऱ्यावरच बैठक मारली. हवेतील सुखावणारा गारठा, काळोखात दडलेले अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, रतनगड यांच्या वेढ्यात झोडलेली मेजवानी साधा बेत असूनही पंचपक्वानांना मात देवून गेली. गरमागरम जेवल्यावर थंडी एकदम दूर पळून गेली. थोडेसे पुढे जाऊन जरा निवांत जागा पाहून तंबू लावला. मस्तपैकी खव्याचे पेढे खाऊन एका उनाड दिवसाचा शेवटहि गोड करुन पडी मारली.
सकाळी सकाळी नाष्टा करायला 'साम्रद' मध्ये यशवंतराव बांडे मामांच्या घरी पोहोचलो. श्रीकांत आणि आदित्य बरीच वर्षे त्यांच्याकडे नेहमी जातायत त्यामुळे संबंध अगदी घराच्यासारखे जुळलेत. मामा कामासाठी राजूरला गेलेले, मामींना 'चहा-पोहे' सांगितले तर त्यांनी जेवायलाच बसा म्हणुन आग्रह सुरु केला. वेळ सकाळी ९.३० वाजताची, इतक्या सकाळी जेवायचे? पण आग्रह काही मोडवेना, म्हणुन थोडेसेच जेवु आम्ही असे सांगीतले. अवघ्या १५ मिनिटांत 'चला जेवायला पाने घेतलियेत' म्हणुन बोलवणे आले. आत गेलो तर एकदम साग्रसंगीत बेत होता. पुरणपोळी त्यावर गुळवणी, कुरडई, भजी, कटाची आमटी आणि ताज्या हिरव्या मिर्चिचा झणझणित ठेचा. अहाहा।। काय फर्मास मेनू आणि चव तर लाजवाब।। फक्त थोडेसे जेवु असे म्हणून जेवायला बसलेलो आम्ही, पण असा काही आडवा हात मारला की जेवल्यावर जागेवरुन उठणेपण जड झालेले. तुडुंब भरलेले पोट, तृप्त झालेले मन आणि अशक्य झालेली सुस्ती..सगळेच सावरुन जागेवरुन उठलो आणि बॅगा आवरून शतपावली करायला सांदणकडे निघालो.
सागर


No comments:

Post a Comment