आजोबा किल्ला



रतनगड उतरून खाली यायलाच चार वाजलेले. पोटपूजा करुन इतर मंडळींचा निरोप घेतला आणि राजूर गाठले तेव्हा तिन्हीसांज होत आलेली. अजुन एक दिवस हाताशी होता त्यामुळे हरीशचंद्रगड का आजोबा अशी द्विधा मनस्थिती झालेली. हरीशचंद्रगड जीतका ओळखीचा तीतकाच अनोळखी आजोबा किल्ला. अखेरीस चहाच्या घोटाबरोबर तो प्रश्न निकालात निघाला आणि आम्ही आजोबाकडे निघालो. कुमशेतमध्ये चौकशी केली तर गाडी अजून पुढे ठाकुरवाडीपाशी जाईल असे कळाले. कच्च्या रस्त्यावरुन पुढे जाताना अंधारात डोळे चमकलेले दिसले. पहिल्यांदा गाडीच्या काचा वरती केल्या व गाडी मागे घेऊन बघितले तर कोल्होबांनी दर्शन दिले. 

आमची चाहूल लागताच त्यांनी जंगलात धूम ठोकली. ठाकुरवाडी गाठली आणि पुढे आजोबाच्या पायथ्याशी शेतात एक घर आहे, तिकडे मुक्काम करता येईल हे कळाले. गाडी तशीच पुढे दामटवली. अतिशय कच्चा रस्ता, बाजूला घनदाट जंगल, गच्च काळोख, रातकिड्यांची किर्रर्रर्र अशी किरकिर व दर थोड्या अंतराने दिसणारे कोल्हे. अखेरीस एका तलावापाशी रस्ता गुडुप झाला आणि 'ये कहा आगए हम?' अशा अवस्थेत आम्ही गेलो. भयाण काळोख आणि जंगलातील नीरव शांतता हे पुन्हा नव्यानेच अनुभवत होतो. खाली उतरून अंदाज घ्यावा तर अनायसेच कोल्ह्यांना मेजवानी मिळायची. थोडा वेळ तसेच शांत बसून वेळ घालवल्यावर बॅटरी व एक काठी घेऊन खाली उतरलो. 'बुडत्यास काठीचा आधार' म्हणजे नक्की काय याची प्रचिती तेव्हा येत होती. बॅटरीच्या प्रकाशात फक्त समोरील तलावातील पाणी आणि आजुबाजूचे जंगल इतकेच काय ते दिसत होते. किल्ला आणि एकुलते एक घर यांचा तर थांगपत्ताहि लागत नव्हता. अखेरीस परत मागे फिरून ठाकुरवाडित मुक्काम करायचे ठरवले. परत फिरलो आणि वाटेत जंगलातून येणारे तीन बॅटऱ्यांचे प्रकाशझोत दिसले. आता इतके आलोयच तर यांना विचारून बघू, मिळालेच घर तर दुसऱ्या दिवशीची पायपिट आणि वेळ वाचणार होता. परत खाली उतरून त्यांच्याकडे निघालो. तर ते त्रिदेव थांबायलाच तयार नव्हते. 'प्राण्यांपेक्षा माणसाला माणसाचीच भिती जास्त वाटते' हेच खरे. अखेरीस त्यांना गाठुन 'कोण तुम्ही? कुठून आलात?' अशा अनेक प्रश्नांचा भडिमार परतवल्यावर 'आजोबाच्या पायथ्याशी असलेले घर फार आत आहे व ते तुम्हाला आत्ता नाही सापडणार' इतकाच साक्षात्कार झाला आणि दत्तगुरु परत जंगलात अंतर्धान पावले. परत एकदा ठाकुरवाडी गाठली तोपर्यंत मुक्कामी असलेला 'लालडब्बा' दिवसभराची खुडबुुड संपवुन शांतपणे पहुडलेला. आमचाहि चतुष्पाद रथ त्याच्या शेजारी उभा करुन बाहेर पडलो तर लगेच लालडब्ब्याचे चालक-वाहक आणि गावातील दोनचार म्हातारी मंडळी गोळा झाली. पुडिबरोबर चघळायला मिळालेले आयतेच चालून आलेले गिऱ्हाईक कोण सोडणार? आम्हालाही फक्त पोटपूजेचा प्रश्न सोडवायचा होता बाकी काहीच प्रश्न नसल्याने आम्ही देखील निवांतच होतो. एकाने लगेच घरी काय आहे बघतो म्हणत जेवायचा प्रश्नही निकालात काढला तर दुसऱ्याने तुमच्यासारखेच पाव्हणे 'आमच्याबी घरी आलेत , चला ओळख करुन देतो' म्हणून आम्ही तिकडे निघालो. ओळख झाली ती वर्षाकाठी औरंगाबादहुन आठदहा दिवस सहकुटुंब निवांत मुक्कामी येणाऱ्या रूपावेल काकांशी. सहयाद्रित असे मनमुराद फिरणारे मनमौजी भेटले की अनोळखी असल्याची जाणीव काही क्षणातच दूर होते आणि अगणित विषयांवर गप्पा रंगतात. आसपासचा परिसर, किल्ले, घाटवाटा सगळेच त्यांच्या बोलण्यातुन उलगडत होते. 'इथवर आलयत तर गुहिरेची वाट पण बघा' असे त्यांनी म्हंटल्यावर डोक्यात लगेच वेळेची गणिते मांडणे सुरु झाले. आजोबा किल्ला करुन वेळ मिळाल्यास गुहिरेची वाट बघुन पुणे गाठायचे होते. त्याचबरोबर तीन दिवस 'घनचक्कर, भैरवगड, रतनगड' केल्यामुळे आलेल्या थकव्या कडेही दुर्लक्ष करुन चालणार नव्हते. विचारांची तंद्री भंग पावली ते 'चला हो जेवायला' या हाळीने. रूपावेल काकांचा निरोप घेतला आणि जेवायला निघालो. हातपाय धुवून पानावर बसलो तर थाळीत नदितील खेकड्यांचे कालवण व भात आणि त्याचबरोबर चुलीवर भाजल्या जाणाऱ्या तांदळाच्या भाकरींचा वास. अहाहा||| न मागताही सुखाचे असे क्षण चालून येतात आणि केलेली भटकंती खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. खेकड्याचा झणझणित रस्सा सगळी थंडी दुर पळवून लावत होता तर भाकरीबरोबर सोबतीला मिळालेली घरात बनवलेल्या लोणच्याची आंबटगोड अशी करकरीत फोड जेवणाची लज्जत वाढवत होती.  प्रेमळ आग्रह आणि अतिशय चवदार जेवण त्यामुळे दुपारी चार वाजताच आम्ही जेवलोय याचा विसर पडून चार दिवसांचे भुकेले असल्यासारखे खेकड्यांच्या नांग्या तोडून रस्सा ओरपत होतो. भरपेट जेवून तृप्त झाल्यावर जागेवरुन कसेबसे उठलो. जवळच्याच शाळेच्या आवारात तंबू लावला. थोडिशी शतपावली करुन आजुबाजूच्या परीसराचा आढावा घेतला आणि तंबूत पडी मारली.

सागर
http://sagarsatishmehta.blogspot.in/?m=1

No comments:

Post a Comment