भटकंतीमित्र - गणेश मोरे


भटकंतीमित्र ही संकल्पना सुरु झाली आणि 'एकसे बढकर एक' लेख वाचायला मिळु लागले. ज्यांच्याबरोबरीने अनेक ट्रेक केले त्यांचे नानाविविध पैलू यामुळेच उलगडले. प्रत्यक्षात ज्यांचे कधी 'Thank you' म्हणून आभार मानले नाहीत, ती संधि आता उपलब्ध झाली त्याबद्दल 'साहेबा' (बोम्बल्या फकीर) पहिले तुझे आभार.

इतके दिवस सुरुवात कोणापासून करावी याचाच विचार करण्यात घालवले, कारण आजवरच्या भटकंतीत इतके अवलिये जोडले गेलेत की रोज एक या हिशोबाने लिहायला घेतले तरी अनेक वर्ष लागतील. 'नमनालाच घडीभर तेल' न घालवता सुरुवात करतो ती ज्याच्यामुळे माझ्या भटकंतीचा श्रीगणेशा झाला त्या 'गणेश मोरे' याच्यापासून.
याची पहिली भेट झाली ती शाळेत असताना लावलेल्या क्लासमध्ये, पण खरी ओळख झाली ती कॉलेजमध्ये डिप्लोमाला असताना. रहायला घराजवळच त्यामुळे रोज कॉलेजला एक टेकडी चढुन सोबतीने चालत जायचे. गप्पांना तर अंतच नसायचा त्यामुळे ४-५ कि.मी अंतर कधी सरायचे हेच कळायचे नाही. कॉलेजला १५ मिनिटाच्या सुट्टीत गच्चीवर डबा खाताना दिसणारा सिंहगड खुणावायचा पण पहिली दोन वर्ष अशीच निघुन गेली. शेवटच्या वर्षी 'अरे आपण नुसातेच गप्पा मारतो पण कधी भटकायला गेलोच नाही'..सिंहगडला जायचे का?' असा प्रस्ताव याने मांडल्यावर उघडलेले डबे तसेच बंद केले आणि पुढील लेक्चर बंक करुन सिंहगड गाठला. देवटाक्यातील थंडगार पाणी आणि विंड पॉइंटवरील भर्राट वारा अनुभवला. त्यानंतर जे गडकिल्ले फिरायचे भुत डोक्यावर बसलय ते अजूनही उतरले नाही.
सिंहगड नंतर पहिला ट्रेक केला तो म्हणजे राजगडचा. राजगडच्या पठारावर आपल्या अकलेचे तारे तोडत आकाशातील तारे ओळखण्यात आणि गप्पागोष्टी करण्यात निवांत जमलेली रात्रीची मैफिल. फक्‍त राजगड करायचा ठरवून गेलेलो पण अजून एक गृप भेटल्यावर केलेला राजगड-तोरणा. उन्हामुळे पार हालत झालेली, घसे कोरडे पडलेले, रस्ता चुकून आडवाटेवर शिरलेलो, तरीही न थकता वाट शोधण्याचे याने चालवलेले अथक प्रयत्न. शेवटी २० एक फुटाची भिंत सहज चढून याने सगळ्यांच्या बॅग वरती घेतल्या आणि मागे वळून पाहिल्यावर पलीकडून येणारी छानशी पायवाट दिसली :) तेव्हापासून वाटा चुकण्याचा पडलेला पायंडा अजुनही कायम आहे, फक्त न कंटाळता बरोबर वाट शोधल्याशिवाय शांत बसायचे नाही हे याच्याकडूनच शिकलोय.
अनेक गडकिल्ले सोबतीने पालथे घातलेत. हा बरोबर असेल तर हाच 'ट्रेक लीडर' असा अलिखित नियमच बनला. कुठे जायचे? कसे जायचे? कुठली गावे आहेत? पाहायला काय काय आहे? इत्यादी गोष्टींचा कधी विचारच करावा लागला नाही. फक्‍त कधी निघायचे आणि कुठे भेटायचे इतकीच माहिती पुरेशी. ट्रेकला एकटे-दूकटे न जाता दरवेळेस एखादा नवा भिडू घेऊन येणार आणि आपल्या सोबत त्यालाही भटकंतीचे वेड लावणार. वेळप्रसंगी एखादा भिडू ढपला तर त्याचीही बॅग घेऊन त्याला दिलासा देत एकदम निवांत गप्पा मारत चढणार. कोणी मागे राहिले अथवा हरवले तर परत मागे जाऊन शोधमोहिम सुरु. अफाट स्टॅमिना, ना कधी कंटाळा, ना कधी दमणे.रात्री सगळ्यांना जमवुन गप्पांचा फड कितीही उशिरापर्यंत रंगला तरीही सकाळचा सूर्योदय क्वचितच चुकलेला. कातळारोहणाचे (रॉकक्लायबिंगचे) कौशल्य ही निर्वादीतच. अलंगचा पॅच असाच रोपशिवाय सर केलेला. आम्ही कॉलेजचे लेक्चर बुडवायचे नाही म्हणून ढाकबहिरी वरील मुक्काम टाळून परत फिरलो तर हा एकटाच लोणावळा ते ढाक ट्रेक करुन अंधारातच ढाकच्या गुहेत पोहोचलेला. परत फिरुन जंगलात कुठेतरी रात्र घालवण्यापेक्षा रात्रभर हातात एक काठी घेऊन माकडांना हुसकावुन लावत एकाटयानेच अख्खी रात्र जागुन काढलेली. 'गिरीप्रेमी' बरोबरच्या पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेत ऑक्सीजन सीलेंडरच्या प्रॉब्लममुळे शिखर सर नाही करता आले तरी हताश न होता दुप्पट जोमाने तयारी करुन पुढील वर्षीच एव्हरेस्ट शिखर सर केलेच. अशी जिद्द आणि चिकाटी अंगी बाणगलेला. "Mt. Friendship" मोहिमेच्या (expedition) वेळेस बॅग भरण्यापासून ते बुट घालण्यापर्यंत सगळ्या कामात मला मदत करणारा. दमल्यावर "अजुन किती जायचय हे न बघता तु फक्‍त श्वासावर नियंत्रण ठेवुन एकाच स्पीडने चालत रहा" हा सल्ला अजुनही सह्याद्रीत भटकताना कामी येतो.
याच्याबरोबर भटकतानाच्या अनेक आठवणी अजुनही तश्याच आहेत. "कधी कंटाळा आला म्हणून घरून एक चादर उचलून निघायचे आणि रात्रभर सिंहगडाच्या विंडपॉइंटवर गप्पा मारून सकाळी परत यायचे, नाशिक भागातील तीन दिवसात पाच किल्ल्यांना दिलेली धावती भेट, धोडपवर कुडकुडत शेकोटीपाशी बसून घालवलेली अख्खी रात्र, सोनकी-कारवीच्या फुलांनी बहरलेला रतनगड, अंजनेरीवरील पठारावर एकावर एक दगडे रचुन बोललेला नवस, हरिहरच्या पायऱ्यांचा पहिल्यांदा अनुभवलेला थरार, अमृतेश्वराच्या मंदिरात कधी मीठ जास्त तर कधी पाणी असे खेळत भजीचे तळलेले असंख्य घाणे. बाईकवर दोघांच्या दोन जड बॅग सांभाळत अनावर झालेली झोप कशीबशी आवरत केलेला नाशिक ते पुणे प्रवास, हरिश्चंद्रवर रात्री गप्पांची मैफिल संपल्यावर तिकडेच मारलेली पडी आणि सकाळी उठुन गुहेत जाऊन हाती लागतील ते डबे-भांडी बडवत घातलेला धिंगाणा, गोरखगडाच्या छोट्याश्या रॉकपॅचवर दुर्गपासून साथ देणाऱ्या भु-भु ला वरती चढवण्यासाठी पुढील पाय याने आणि मागील पाय मी धरून चढवायचे केलेले निष्फळ प्रयत्न, रतनगड ते हरिश्चंद्रगड ट्रेकच्या वेळेस सोबत आणलेले ५-६ मॅप जोडून आपण कुठे आहोत याचा शोध घेण्यात अर्धा तास घालवल्यावर आपण  मॅप उलटा धरलाय हे लक्षात आलेले, हरिश्चंद्रवर कोकणकडा रॅपल करायला गेलो असताना मधमाश्या उठल्याने काढावे लागलेले २ दिवस, महीपतवरील जंगलातील मुक्काम, अलंग-मदन खिंडीत पोहोचल्यावर बरोबर पहिल्यांदाच भटकायला आणलेल्या साउथसाईडकडील मुरलीने "ये सह्याद्री कहा हे?" असे विचारल्यावर बघण्यासारखे झालेले आमचे चेहरे, अंधार पडल्यावर अलंगच्या मागील जंगलात घालवलेली रात्र, रायरेश्वर पठारावरील कंबरेएवढया गवतात केलेली भटकंती, प्लस व्हॅलीतील क्लायबिंग, धो-धो पावसात भिजत केलेले अडसूळ-अशेरी, नाफ्ताची रेकी करायला गेल्यावर खिंडीत पोहोचल्यावर आपण बरोबर घेतलेला गाईड मुका आणि बहिरा आहे हे लक्षात आल्यावर हसावे का रडावे अशी झालेली अवस्था" अशा अगणित आठवणी.
बऱ्याच महिन्यात एकत्र भटकायला जमलेच नाही. पण लवकरच एक पुर्वीसारख्याच मोठ्या ट्रेकचा बेत शिजतोय. तेव्हा योग जुळून येईलच.

सागर
#भटकंतीमित्र
#gypsy_soul



No comments:

Post a Comment