आषाढी एकादशी - २७ जुलै २०१५


 आषाढी एकादशी म्हणले की अजूनही आठवते..पहाटे पहाटे जाग यायची ती पंडित भीमसेन जोशी यांचे लाऊडस्पिकरवरील अभंगांचे स्वर कानावर पडले की..घरी सगळ्यांचाच उपवास त्यामुळे आपसुकच घडलेला उपास
..साबुदाणा खिचडी, रताळ्याची भाजी, बटाटयाचे वेफर्स, उपासाचा चिवडा, साबुदाणा वडे, हिरव्या मिराच्यांची चटणी, वरईचा भात-आमटी, खजूर, लाडू, फळे..अशा अनेक पदार्थांची रेलचेल..शाळेला सुट्टी त्यामुळे अभ्यासाला बुट्टी..दिवसभर घातलेला हुडदुस..दुपारी रंगलेला पत्ते आणि कॅरमचा डाव..दुपारी उन्ह उतरली की विट्ठलवाडीच्या जत्रेत मारलेली चक्कर..इभृती आणि खरवसचा खाऊ..सर्वात उंच चक्रात बसण्यासाठी केलेला हट्ट..छर्याच्या बंदुकिने कोण जास्त फुगे फोडतो याची स्पर्धा..घोळक्यातून धक्काबुक्की सहन करत बघितलेले जादूचे प्रयोग...पॅ..पॅ करणार्या पिपाण्यांनी सगळ्यांचे डोके उठवणे..रंगीबेरंगी पिसांची शंकुच्या आकाराची टोपी घालुन मिरवणे..जत्रेत खरेदी केलेल्या खोट्या तलवारी आणि गदा घेऊन केलेली लुटूपुटूची लढाई..चित्रविचित्र मुखवटे घालून केलेल्या हाणामाऱ्या.."जादुच्या आरशात" कधी उंच, कधी बुटका, कधी जाड, कधी बारीक, कधी उभा, कधी लंबगोल..असे येडेगबाळे रूप बघून एकमेकांना चिडवणे..आणि दरवर्षी नेमाने येणाऱ्या पावसात भिजत घरी परतणे..अशा अगणित गमतीजमती. 
आज ऑफिसला जाताना जत्रा भरलेली पाहिली..तेच उंच पाळणे..तीच लोकांची गर्दी..आई-बापाचा हात धरून लहानग्यांचे चाललेले हट्ट..तर कुणी रस्त्यातच पसरलेले भोकाड..तर कुणी आपल्याच धुंदीत हरवून रमलेला मस्तमौला..हे सगळे बघुन ऑफिसला दांडी मारावी अन परत एकदा लहान होऊन  जत्रेतील मजा अनुभवावी हा मोह अनावर झालेला..पण कामाचा पडलेला ढिग आणि अपुऱ्या सुटट्या..त्यामुळे मोह आवरला आणि मन मारून ऑफिसला निघालो..इतरांनी जरी त्या गर्दी आणि ट्रॅफिकला शिव्यांची लाखोली वाहिली तरी माझ्यासाठी मात्र त्याच गर्दीमुळे अनुभवायला मिळालेले जत्रेतील दोन क्षण पुरेसे होते..बाकी सारे आता वासुदेवा सारखेच काळाच्या उदरात गुडुप झालय आणि केवळ आठवणींच्या रुपात मागे उरलय.

शेवटी
"
शौक तो सिर्फ माँ बाप के पैसेसे पुरे होते थे!
अपने पैसोसे तो सिर्फ जरुरते पुरी होती है!"
हेच खरंय.

कालाय तस्में नमः!!


सागर

No comments:

Post a Comment