इंद्रायणी/चंद्रसेनगड/टोपी - चांदवडचा किल्ला २३ डिसेंबर २०१४



बऱ्याचदा असे होते की आपल्या समोरील सगळेच मार्ग अचानक कुठेतरी गुडुप होऊन जातात. आता पुढे काय? या संभ्रमात आपण हरवून जातो आणि त्याचवेळी अचानक कोणीतरी देवदूतासमान आपल्यापुढे उभा ठाकतो, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरीता. सहयाद्रित भटकताना असे असंख्य अनुभव आलेत, इंद्रायणी किल्ला बघायला गेलो तेव्हाही याच अनुभवाचा पुनःप्रत्यय आला.
तीन दिवसात सेलबारी-डोलबारी रांगेतील हरगड, मुल्हेर, मोरा, साल्हेर, सालोटा, न्हावी(रतनगड), मांगी-तुंगी हे किल्ले बघुन झालेले. आता चांदवड परिसरातील राजधेर किल्ला बघुन इंद्राई किल्ल्यावर मुक्कामी जायचे म्हणून मांगी-तुंगी वरुन निघालो. सहज म्हणून चांदवडजवळ अजुन काय बघता येईल याचा शोध घेत होतो तेव्हा इंद्रायणी किल्ल्याची माहिती मिळाली, प्रस्तारोहण आवश्यक हे कळले. पण आमच्याबरोबर काहीच साधने नव्हती म्हणून वेळ आहे हाताशी तर जाऊन तर बघू म्हणून ठरवले. वाटेत तर्रीदार मिसळ आणि खड़ीचम्मच चहा घशाखाली उतरल्यावर ट्रेकला आम्ही पूर्णपणे सज्ज झालेलो. चांदवडमधील 'श्री. चंद्रेश्वर महादेव' मंदिरापाशी गाडी लावली. जवळच असलेल्या चौकितील मामांनी 'त्या बाजूने वर जावा, वाटेत रश्शी आहे, त्याला धरून वर जावा' असे सांगून आम्हाला वाटेला लावून दिले. जिथुन वर जावा असे सांगितलेले त्या टोकाला पोहोचल्यावर पुढे काय हेच उमगेना. एकीकडे तुटलेल्या तटबंदीच्या दगडांची रास पडलेली तर दुसरीकडे एक अजस्त्र कडा आडवा-लांब पसरलेला. नक्की वरती कुठून जाता येईल हेच कळेना. परत फिरायचे का वाट शोधण्यात वेळ दवडायचा या बुचकळ्यात आम्ही पडलेलो आणि अचानकच एखाद्या देवदुतासमान चांदवडमधील 'संतोष पवार' आमच्यासमोर प्रकटला. चांदवडमधील कांद्याच्या मार्केटमध्ये काम करणारा आज सुट्टी म्हणून एकटाच भटकायला निघालेला. चांदवड मधून येणाऱ्या एका बिकट वाटेने चढून आलेला. आम्हाला किल्ला पहायचाय आणि वाट नाही मिळते समजल्यावर क्षणाचाहि विलंब न लावता 'चला मी दाखवतो' म्हणून आमच्या पुढे निघालाही. दगडांची रास चढुन गेल्यावर पुढील नजारा पाहून आवाक झालो. किल्ल्यावर जाण्यासाठी दगडांच्या रासेवर उभी असलेली १०-१५ फुटांची शिडी आणि त्यावरील ३०-४० फुटांचा पॅच चढण्यासाठी  गंजलेल्या २-३ कुंपणाच्या तारांच्या वेटोळयाचा गुंडाळा. आ-वासुन उघडलेले आमचे तोंड पूर्णपणे मिटलेपण नव्हते तर हा पठ्ठया 'वरती येणार ना?' या प्रश्नाला आमच्या होकाराचीही वाट न बघता पायात स्लीपर असूनही त्या तारांना लोंबकाळत वरती पोहचलापण. आम्ही मात्र अजूनही हो-नाही या संभ्रमातच अडकलेलो. शेवटी तेहतीस कोटी देवांपैकी जितके आठवतील त्या सर्व देवांचा धावा करुनच शिडीवर पाऊल ठेवले. वरच्या तारेला लोबकळून वरती जायचे काही धाडस होईना. शिडी चढल्यावरही वरती जायचे का परत फिरायचे याचा विचार करण्यातच ५ मिनिटे निघुन गेली. शेवटी इथपर्यंत आलोच आहोत तर तसेच मागे फिरायचे नाही, हा निश्चय पक्का करुनच कसेबसे लोंबकाळतच वरती गेलो. 'जिव भांड्यात पडला' याचा खरा अर्थ वरती सुखरूप पोहोचल्यावर कळला. वरती आलोय खरे पण आता खाली कसे उतरायचे? हा प्रश्न डोक्यात घोळवतच संतोष बरोबर सगळा गड फिरलो. कपारीतील्या गुहेतील थंडगार पाणी पिल्यावर जिव सुखावला. किल्ल्यावरून दिसणारे 'श्री. चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर, समोर दिसणारे इंद्राई, राजधेर, कोळधेर हे किल्ले, ३ डोंगर ज्यांना राम,लक्ष्मण,सीता यांचे रोट म्हणतात आणि चांदवडचा परीसर' सगळेच दृश्य नेत्रसुखद होते. आत्तापर्यंत केलेला सगळा अट्टाहास सार्थ झाला. संतोषने सगळा आजुबाजुचा परिसर दाखवून संबधित माहिती पुरवली. किल्ल्यावर एका वाड्याचे भग्न अवशेष आणि पाण्याची टाकी व तलाव आहेत. ते बघुन परतीच्या वाटेला लागलो. परत एकदा तारेवरचा आणि शिडीवरील डोंबाऱ्याचा खेळ अनुभवला. शिडीवरुन उतरल्यावर पाय जेव्हा जमिनीला टेकला तेव्हा सुखरूप पोहोचल्याचा आनंद शब्दात मांडणे कठिणच. जसा अचानक भेटला तसाच झटकन आमचा निरोप घेऊन संतोष निघुनही गेला आणि आम्ही आमच्या पुढचे लक्ष असलेल्या इंद्राई किल्ल्याकडे मोर्चा वळवला.


सागर

2 comments: