कुर्डुगड - निसणीची वाट १३-१४ जून २०१५


गडकिल्ले फिरण्याच्या नादात अनेक घाटवाटा करायच्या राहुनच गेल्यात. यावेळेस मात्र कुर्डुगड आणि निसणीची घाटवाट असा दुहेरी योग साधायचा असे ठरवुनच निघालो. तसे आठवडाभरात कोकण ते नाशिक या पट्टयातील अनेक ट्रेक आणि घाटवाटा 'हे नको..ते करू'

असे ठरवत रचलेले मनसुबे धुळीस मिळालेले. मग शेवटी हा प्लॅन पक्का करुन एकट्यानेच जायचे ठरवले. शनिवारी दुपारी ३ वाजता निघुन रविवारी रात्री परत यायचे हे ठरले. श्रद्धाला प्लॅन कळाल्यावर शून्य मिनीटातच 'मी पण येणार' हे तिने जाहिर केले. एकाचे दोन झाल्यावर सगळे सामानही त्याच पटीने वाढले आणि 'फक्त पाचच मिनिट' हा फेमस डायलॉग ४-५ वेळा ऐकवल्यावर सरतेशेवटी आम्ही ४ वाजता निघालो. किरकोळ खरेदी उरकत पिरंगुट गाठले. गरमा-गरम चहाचे घोट घशाखाली उतरल्यावर तरतरी आली. अधुन-मधून येणाऱ्या पावसाच्या रिमझिम सरी झेलत आणि 'रोड किती चांगला आहे ना?' असे कौतुक केल्या केल्या गाडी समोरच्या मोठ्या खड्डयात जाऊन आपटावी, हे सगळे अनुभवत तिन्हीसांजेला 'धामणओहोळ' मध्ये पोहोचलो. पावसाळी ढगांमुळे सगळीकडे अंधारून आलेले. मंदिरामागे जरा रिकामी जागा पाहून तंबु ठोकला. 'सुप आणि डाळ-तांदळाची खिचडी' असा साग्रसंगीत बेत होता. सुप होईपर्यंत गावकारी मंडळींचा समोरच्या तलावात बॅटरीच्या प्रकाशात खेकडे पकडण्याचा चालू असलेला खेळ पहात बसलो. चुलीवरुन पेल्यात पडलेले गरमा-गरम सुप पित असतानाच काळ्या ढगांचे सावट जरासे दूर होऊन छानसे चांदणे पडलेे, त्यातूनच रंगीबेरंगी दिव्यांची उघडझाप करत एक दोन विमाने जात होती. हे पहातच चांगले मोठ्या पेलाभर सुप संपवले. तोपर्यंत खिचडी शिजून आमचीच वाट पहात होती. आता चौघांसाठी असलेले सुप मस्त गाढे करुन दोघातच संपवलेले मग खिचडीसाठी पोटात जागाच नव्हती. शेवटी लहान मुलांना करतात तसेच 'एक घास चिऊचा..एक घास काऊचा' असा स्वतःलाच दिलासा देत मिरची आणि आल्याचा अर्क उतरून तयार झालेली झणझणित आणि चविष्ट खिचडी पोटात ढकलली. सकाळी लवकर उठायचे म्हणून पटापट आवराआवर केली. थोडावेळ गप्पागोष्टी करत असता अनायसे हातावर येऊन बसलेल्या काजव्याला तंबुत सोडले. रात्रभर चाललेली काजव्याची टिमटिम, मधुनच पडणाऱ्या पावसाची रिमझिम आणि सोबतिला ऐकू येणारे जंगलातील प्राण्यांचे आवाज ऐकतच डोळे मिटले.

..पुढील भाग असाच कधीतरी :)

सागर

1 comment: