अंधारबन (९ ऑगस्ट २०१४)


सारखा काय घरी बसून असतोस रे, जरा बाहेर जात जा. आमच्या अर्धांगिनी कडून हे वाक्य ऐकल्यावर मी परत एकदा खात्री करून घेतली. नक्की जाऊ ना? होकार मिळाला आणि सुरु झाली परत एकदा सह्याद्रीत भटकंती. नवीन वर्षाची सुरुवातच राजगडावर झाली, सूर्योदयाचे दर्शन सुवेळामाची वरून घेतले आणि तेव्हाच खात्री पटली की हे वर्ष भटकंतीसाठी उत्तम ठरणार.

रायगड, ढाक-बहिरी, तिकोना, रायलिंग पठार या माहितीतल्या ठिकाणांना परत एकदा भेटी देऊन झाल्या आणि मग शोध सुरु झाला थोड्या वेगळ्या वाटांचा. पावसाळा जोरदार सुरु झालेला त्यामुळे बरीचशी ठिकाणे बाद झाली होती. सहजच म.टा चाळताना मन चिंब पावसाळीहा लेख वाचण्यात आला. त्यातीलच अंधारबन एक जंगलहे वेगळे नाव डोळ्यात भरले. मग सुरु झाली अधिक माहिती मिळवण्याची मोहीम. कधीनव्हेते whatsapp आणि facebook या सोशल मिडिया साईटस उपयोगी माहिती मिळवण्याच्या कामी आल्या. मिळालेल्या माहिती आधारे जाऊन तर बघू निदान वाट तरी माहिती पडेल, असा विचार करून जायचे ठरले. नेहमीचे साथीदार गणेश मुझुमदार (पंत) अधिक काहीही न विचारता लगेच तयार झाले. शुक्रवारी रात्रभर काम करून शनिवारी रात्री परत कामाला जायचे होते तरी पण मधल्यावेळेत सह्याद्रीत भटकायची संधी त्यांना गमवायची नव्हती. इतका उत्साह कुठून येतो? पण असे उत्साही भटके भेटले की भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी ५.३० वाजता धायरीला भेटलो. सामानाची बांधाबांध करून पंतांची silencer नसलेली बुलेट घेऊन निघालो. Silencer नसलेले ते धूड जेव्हा रस्त्याने धावू लागले तेव्हा परत वळून न बघणारे लोक फारच दुर्मिळ. वडगावला चहा घेऊन पुढे निघू असे ठरले. चहाला थांबलेलो आम्ही गरमा गरम खिचडी आणि पोहे दिसल्यावर आधी पोटपूजा करू असे न बोलताच ठरवले. मागच्याच आठवड्यातील रायलिंगला जाताना नसरापूर फाट्यावर तळून काळे पडलेले वडे खाल्याची आठवण अजून ताजीच होती. म्हणून गरम गरम खिचडी आणि पोहे मिळणे हे आमच्यासाठी स्वर्गसुखच होते. भरपेट पोटपूजा करून नीघेपर्यंत ६ वाजले होते चला!!! सुरुवात तर छानच झाली होती. बंगलोर पुणे हायवेने चांदणी चौकातून ताम्हिणी मार्गाला लागलो. अजिबात रहदारी नसलेल्या रस्त्यावर बुलेटची धडधड आणि पावसाची भुरभूर या दोनच गोष्टींची साथ होती.पावसाची संततधार सतत सुरु होती त्यामुळे आमचा प्रवासही संथ गतीनेच चालू होता. पौड नंतर येणाऱ्या माले गावात चहासाठी थांबलो. छोटीशी एकच टपरी सकाळी सुरु होती. चहा सांगून गप्पा मारता मारता कळाले की ताम्हिणी घाट ३ दिवस दरड कोसाल्यामुळे बंद आहे. फक्त दुचाकी वाहन जाऊ शकेन हे कळल्यावर आम्हाला बरे वाटले आणि रहदारी का नाही याचे गमक उमगले. ताम्हिणी घाटातून गेल्यावर निवे गावानंतर येणाऱ्या वांद्रे फाट्यावरून उजवीकडे जाणारा रस्ता पिंपरी, भांबुर्डे, तेलबैला फाटा, सालतर मार्गे लोणावळ्याकडे जातो. त्या रस्त्याने पुढे गेल्यावर साधारण १.३० की.मी. नंतर डाव्याबाजूला थोडे मोकळे पठार आणि त्यापुढे अर्धवट रेलिंग आहे. त्या रेलिंगपाशी गेल्यावर समोर जे दृश्य दिसते ते स्तब्ध करून टाकते. समोर उभे असतात सह्याद्रीचे रौद्रभीषण कडे...नावाजी, अंधारबन आणि कुंडलिका ह्या सुळक्यांची रांग...प्रचंड खोल कोकणापर्यंत पसरत गेलेली दरी....आणि या सर्वाना आपल्या हिरव्यागार दुलइने झाकणारे घनदाट जंगल व सुळक्यानवरून थेट दरीत झेपावणारे असंख्य धबधबे. अहाहा!!! काय दृश्य होते ते नजर खिळवून ठेवणारे. वेळ-काळ यांचे भान विसरून निस्तब्ध होऊन फक्त बघत बसावे असे. शब्दात व्यक्त न करता येणारे.
पाय निघतच नव्हते तरी पण समोरील अंधारबनचे जंगल खुणावत होते म्हणून सह्याद्रीच्या अप्रतिम नजराण्याला मुजरा केला आणि पुढे निघालो तर वाटेतच ४-५ गावकरी मंडळी भेटली. अंधारबनच्या वाटेची चौकशी करावी म्हणून सुरु झालेल्या गप्पा शेवटी हाती फार काही माहिती न लागता संपल्या. पुढे गेल्यावर एक बंधारा लागतो आणि तिथूनच सुरु होते अंधारबनची वाट. इतकीच काय ती उपयुक्त माहिती हाती लागली बाकीची सगळी डाव्या-उजव्याच्या गोंधळातच हरवली होती. शेवटी काय तर सह्याद्रीत भटकताना धुत्या अंगाला का खात्या अंगाला हेच काय ते या गोंधळातून सुटका करू शकते हा जुनाच धडा पुन्हा एकदा गिरवला आणि पुढे निघालो. सकाळचे ८ वाजून गेले तरी रस्ते धुक्याच्या दुलईत हरवून गेले होते, त्यामुळे बाजूचा बंधारा आम्ही कधी मागे टाकला ते कळलेच नाही. सरळ जाऊन पोचलो ते पिंपरीला. अरे पोरानो तुम्ही लई पुढे आलातहे ऐकून परत माघारी वळलो. वाटेत एक शेतकरी दादा बैलांना जुंपून शेतीची कामे उरकत होते. त्यांच्याकडून नीट माहिती घेतली आणी वाटेला लागलो. पराते वाडीवरून थोडे पुढे आले की डाव्या बाजूला बंधारा लागतो. तिथेच विशाल पडवळ यांचे हॉटेल जलसृष्टी आणी बोटिंगलागते. गाडी तिकडेच लावली. चहा व गप्पांचा कार्यक्रम पार पडला आणि आम्ही अंधारबनकडे मार्गस्थ झालो. पाझर तलावावरील बंधारा पार केला आणि गप्पा मारत पुढे निघालो. वाट चांगली रुळलेली होती आणि धुक्यामुळे आजूबाजूचा परिसर काहीच दिसत नव्हता. साधारण २० मिनिटानंतर पुढे दूरवर काही घरे दिसू लागली. मिळालेल्या माहितीप्रमाणे अंधारबनवरील वाटेत जे हिर्डीगाव लागते ते साधारण २-३ तास चालल्यानंतर. म्हणून जरा पुढे जाऊन अंदाज घेतला आणि कळाले की आम्ही अंधारबनकडे न जाता पिंपरीला आलोत. नेहमीप्रमाणेच अनोळखी ट्रेकची सुरुवात ही वाट चुकूनच होते तसेच या वेळेस पण झालेले. मगाशीच भेटलेल्या शेतकरी दादांचा बैलांना हाक्ल्याचा आवाज जवळूनच येत होता. पंतांच्या म्हणण्यानुसार आता जर आम्ही त्यांच्या पुढे जाऊन उभे ठाकले असतो तर नक्कीच त्यानी बैलांना सोडून आम्हाला शेतीच्या कामाला जुंपले असते. म्हणून कोणाला काहीही न विचारता आल्या पावली मागे फिरलो. वाटेतच दुसरा एक राजमार्ग दिसला त्या वाटेला लागलो. आजूबाजूचा परिसर आता धुक्यातून स्वतःला सोडवून घेत होता, त्यामुळे आम्हाला सिनेर खिंडीत जाणारे टोवर्स दिसले आणि खात्री पटली की आम्ही बरोबर वाटेवर आहोत. या टोवर्स खालूनच अंधारबनकडे जाणारी वाट सुरु होते. अंधारबन अतिशय निबिड असे अरण्य आपल्या नावाला अगदी सार्थपणे जागणारे. काही ठिकाणी तर गर्द झाडीमुळे भर दिवसापण सूर्यकिरणे खाली पोहचू शकत नाहीत. पुण्यापासून असे जंगल अवघे ७० की. मी. वर आहे हे सांगून फार जणांना पटणारपण नाही. घनदाट अशा या जंगलाने पावसाळ्यात हिरवागार गालिचा पांघरला होता व साथीला धबधबे तर होतेच. वाट चांगलीच मळलेली असल्यामुळे चुकण्याची शक्यता तशी कमीच. आम्ही चालायला सुरुवात केली आणि जोरदार पावसाने आमचे या जंगलात स्वागत केले पण वेळेचे बंधन असल्यामुळे आम्हाला थांबून चालणार नव्हते. साधारण ३ तास चालल्यावर हिर्डी गाव येते आणि तेथून पुढे खाली कोंकणात उतरले की २ तासावर भिरा गाव लागते. बरीचशी मंडळी गाडीने परातेवाडीला उतरतात व ड्रायवरला गाडी घेऊन भिर्याला बोलावतात. कारण भिर्यातून परत वरती यायला फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही दुचाकी आणलेली होती म्हणून हिर्डी पर्यन्त जाऊन परत येणार होतो. वेळेअभावी वाटेत लागणाऱ्या धबधब्यांखाली मस्त भिजायचा मोह आवरता घ्यावा लागत होता. परत येताना वेळ मिळाला तर बघू असे स्वतःलाच समजावत निघालो. पावसाची रिपरिप तर सतत चालू होतीच आणि वाटा पण निसरड्या झालेल्या. त्यामुळे प्रत्येक पाउल जरा जपूनच टाकावे लागत होते. चुकून जरी पाय घसरला तर २-३ महिन्याची बिनपगारी सुट्टी घेउन घरी बसणे न परवडणारे. वाटेत २-३ ठिकाणी धबधबे पार करावे लागले. पाण्याच्या प्रवाहाला फार जोर नव्ह्ता त्यामुळे बिनदिक्कत पार करता आले नाहीतर तिथूनच परत फिरावे लागले असते. साधारण २ तास चालल्यावर विश्रांतीसाठी थांबलो. बरोबर आणलेल्या फळे व बिस्किटांचा आस्वाद आजूबाजूचा परीसर न्याहाळत घेतला. पावसाने पण जरा उघडीप घेतली होती म्हणून इतकावेळ बंद ठेवलेला मोबाईल सुरु करून फोटो काढून घेतले आणि पुढे निघालो. अंधारबनच्या जंगलात बरेच प्राणि आहेत असे कळाले होते त्यामुळेच आम्ही कुठे काही दिसते का याचा शोध घेत चाललो होतो. पण आम्हाला मात्र वाटेत रानकोंबड्या आणि खेकडेच दिसले. श्रावण असल्यामुळे त्यांना फक्त बघण्यावरच समाधान मानावे लागत होते. पुढे निघालो आणि इतकावेळ छान रुळलेली पायवाट अचानक कुठेतरी गायब झाली. सामोरे एक झाड आडवे झाले होते ते पारकरून पुढे वाट असेन म्हणून जरा शोध सुरु केला पण वाट काही मिळेना. एका धबधब्याची वाट थोडी खाली उतरून पण पहिले. पण पुढे फक्त होती ती घनदाट झाडी. थोडावेळ शोधघेऊन काहीच हाती लागेना. वेळेचा हिशोब मांडला आणि उरलेल्या वेळेत हिर्डीपर्यन्त जाऊन येणे पण अवघड आहे हे उमगले. काहीसे हिरमुसले होऊन परतीचा मार्ग पकडला ते पुढच्यावेळेस येताना वेळेची काहीही बंधने न ठेवता थेट भिर्यापर्यन्त जायचे असा निश्चय करुनच. परतीच्या वाटेवरच धबधब्याखाली मस्त आंघोळी उरकून घेतल्या आणि २ तासाची पायपीट करून आम्ही परत एकदा हॉटेल जलश्रुष्टीला पोचलो. गरमा गरम जेवण तयारच होते त्यावर आडवा हात मारला. भरपेट जेवण झाल्यावर गप्पा मारत असताना कळाले की बंधारापार केला की खाली कुंडलिका दरीत उतरूनपण भिर्यापर्यंत जाता येते. पण हा मार्ग फक्त पावसाळ्यानंतरच करता येतो. चला एक नाही तर दोन-दोन नवीन वाटांची माहिती मिळाली होती, सह्याद्रीचे अजून एक नवे रूप बघायला मिळाले होते आणि गाठीशी जमा झाला होता जंगलवाटांमध्ये भटकण्याचा अनुभव.. हेही नसे थोडकेम्हणत लवकरच पुढच्या भेटीचे आश्वासन देत आम्ही परतीच्या मार्गाला लागलो!!!

सागर मेहता

1 comment: