रायगड - बुलेट राईड - ५ जुलै २०१५



जून महीना अखेरपर्यंत पाऊस चांगलाच सुरु झालेला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पावसाने परत एकदा दडी मारली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीहि 'कमरेवरचे हात सोडुनी आभाळाला लाव तुढगाला जरा हलवुनी भिजव माझा गाव तुहे  गार्‍हाणे या वर्षीहि पांडुरंगाकडे मागावे लागणार अशी लक्षणे दिसू लागली. तब्बल एक आठवडा पावसाने

विश्रांती घेतलिय तर मागील आठवड्यात अपूर्ण राहिलेला 'नाखिंद' पूर्ण करायचा बेत आखला. सकाळी बरोब्बर ६ वाजता घर सोडले. केतकवळ्याला चहा पिऊन थेट रायरेश्वरची खिंड गाठली. आदल्यादिवशी बघितलेले 'थोडेसे ढगाळ' हा हवामान अंदाज साफ चुकीचा ठरलेला. घाटमाथ्यावर काळ्या ढगांनी दाटी करुन बरसायला सुरुवात केलेली आणि त्यात धुके दाटलेले. गेल्यावेळचा धुक्यात हरवण्याचा अनुभव अजुन ताजाच होता म्हणुन नाखिंद रद्द करुन रायगड गाठायचा ठरवले. वर्षभरापुर्वी रायगड उतरून खाली आल्यावर साधारण शंभरएक बुलेटची धडधड अजून कानात घुमत होती. आजही तोच ग्रुप रायगडला जाणार होता,त्यांच्या बरोबर जायचे ठरवून वरंधा घाट गाठला. वरंध्यात स्वागतच पावसाच्या सरीने केले. मस्तपैकी गरमा-गरम मिसळ आणि वडापाव रेमटवले आणि बाकिची मंडळी येईपर्यंत कावळ्याची निम्मीवाट तुडवत शतपावली केली. परत आलो तेव्हा ३० बुलेटचा ताफा जमा झालेला, त्यांच्याबरोबरच रायगड पायथा गाठला. वरंध्यात भरपेट खाणे झालेले म्हणून त्यांच्याबरोबर जेवणास न थांबता चित्त दरवाजा गाठला. नेहमी प्रमाणेच पहिल्या पायर्यांनीच जीव काढला. हाशहुश करतच पहिली सपाटी गाठली. रविवार असल्याने गर्दी अफाट होती आणि जोडिलाच त्यांनी केलेला कचरा जागोजागी बघुन मन विषण्ण होत होते. वाटेतील धबधब्यांखाली तर घरी पाणी येत नाही अश्या आंघोळी चाललेल्या. पुढे गेल्यावर एक महाशय खालील धबधब्यातील लोकांना शिवांबु स्नानाचे पुण्य मिळवून देत होते. हसु आवरतच माथा गाठला. आधी टकमक टोकाकडे मोर्चा वळवला पण कडेलोटासाठी लागलेली रांग पाहून मागे फिरलो आणि राजदरबार गाठला. मेघडंबरी सिंहासनातील राजांना मुजरा करुन दोन क्षण बसलो तर परत एकदा झुंबड जमा झाली. 'चपला खाली काढा..सिंहासनाच्या इथे वरती चढु नका..जरा शांत बसा' हे सगळे ' सुशिक्षित ?' लोकांनाच सांगावे लागत होते. तरीही धुमाकूळ चालूच होता,शेवटी वैतागुन निघालो आणि वाघ दरवाजा गाठला. सुदैवाने तिकडे कोणीही फिरकले नव्हते म्हणून जरा शांतता होती. मागच्या वेळेस केलेल्या रायगड प्रदिक्षणेची वाट न्याहाळत जुन्या आठवणींना उजाळा देत जरा आराम केला. अंधार व्हायच्या आत भोर गाठायचे होते म्हणून निघालो. वाटेत भेटलेल्या बुलेट गँगला रामराम केला. खाली उतरताना शेवटच्या बुरुजापाशी जरा गर्दी दिसली म्हणून सहज डोकावले तर एक मजेशीर दृश्य दिसले. एक गाय थोड्याश्या डोंगर उतारावर नेहमीप्रमाणे निवांत चरत होती. जमलेली गर्दी तिला पाहायला थांबलेली. 'इथे छान गवत आहे ते सोडून तिकडे कशाला चरतीये?.. पाय घसरला तर?' असली चर्चा निम्मे जण करत होते तर उरलेले तिला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यात अथवा तिला तिकडून हुसकावुन सरळ वाटेवर आणण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यात व्यस्त होते. तो मजेशीर खेळ बघण्यात थोडावेळ छान करमणूक झाल्यावर निघालो आणि पायथा गाठला. आता मात्र भुकेची जाणीव झाली. मस्तपैकी चहा पोहे खाल्यावर तरतरी आली. अजुन दोन साथीदार माझ्यासोबत निघाले. थोडे पुढे आल्यावर इंधनाची कमतरता असलेला पिवळा दिवा लागला,महाड अजुन २२ किलोमीटरवर होते. बुलेटचे धुड पळवण्यात जरी सुख असले तरी ते ढकलायचे म्हणले की जीव निघतो. पण नशीबाने तशी वेळ येऊ न देता पेट्रोल पंप गाठला. वरंध्यात एक छोटा ब्रेक घेऊन तडक भोर गाठले. चहा-गप्पा उरकल्यावर 'पुढच्या राइडला भेटु' म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. घराजवळ आल्यावर हायवे जसा सोडाला तसा एकजण मागुन सतत पॅ-पॅ हॉर्न वाजवु लागला म्हणून गाडी जरा बाजूला करुन वाट दिली तर एक काडिपेहेलवान 'भाई' आपली २४ इंच छाती फुगवुन एक्टिवा ताणत सर्रकन पुढे निघुन गेले आणि पुण्यात आल्याची जाणीव झाली. घरी आल्यावर दोनघास खाऊन पाठ टेकली आणि डोळे मिटले तरीही ‘रायरेश्वराचा पाऊस, वरंधातील हिरवागार निसर्ग आणि रायगडावरील वाघ दरवाज्यात एकांत अनुभवत डोळ्यात सामावून घेतलेला चौफेर परीसर' हे सगळे डोळ्यांपुढे फेर धरून नाचत होते. ते बघतच कधी झोपी गेलो ते कळलेच नाही. 

सागर

No comments:

Post a Comment