रायरेश्वर - नाखिंद २८ जून २०१५




आजवर रायरेश्वरला अनेकवेळा भेट दिली पण नाखिंद करायचे राहून गेलेले. हाती असलेला रविवार आणि पावसाने दिलेली जराशी उघडीप, मग पहिला प्लॅन ठरला तो नाखिंदचा. एकच दिवस असल्यामुळे पहाटे ४ वाजताच घर सोडले. आनंदनगरला कोणीतरी माथेफिरुने बऱ्याच बाईक आणि कार जाळल्यामुळे सकाळी सकाळी पोलीस आणि अग्निशामक

दलातील लोकांची धावपळ सुरु होती. फुकटचा शो बघणाऱ्या आणि सल्ले देणाऱ्या 'बघ्यांची' गर्दी नव्हती म्हणून वाहतुकिस होणारा अडथळा टळला होता म्हणून आम्ही अलगदपणे पुढे सटकलो. रहदारी नसलेल्या रोडवर पहाटेचा गार वारा झेलत बाईक सुसाट ताणली. कोर्ले गावातील छोटासा चिखलाचा टप्पा ओलांडला आणि एक छोटासा ब्रेक घेतला. डोंगरामागून होणाऱ्या सूर्योदयाचा अप्रतीम नजराणा थर्मासमध्ये भरुन आणलेल्या गरमा-गरम चहाचा आस्वाद घेत अनुभवला. मधुनच धुक्याची दुलई बाजूला सारुन केंजळगड दर्शन देत होता, ते दृष्य बघतच वळणावळणाचा घाट पार करुन खिंडीत गाडी लावली. समोर दिसणारा रायरेश्वर आणि त्यामागे अफाट पसरलेले पठार व जंगल खुणावत होते. इतकावेळ दडून बसलेला पाऊसही आमच्या स्वागताला सज्ज झालेला. पावसात भिजतच रायरेश्वर मंदिराचे पुजारी असलेल्या जंगम मामांचे घर गाठले. नेहमीप्रमाणेच हसतखेळत गप्पागोष्टी करत जुन्या आठवणी जागवल्या. चुलीजवळ बसुन अंगात ऊब साठवली व गरमागरम कोरा चहा आणि पोहे पोटात गेल्यावर तरतरी आली. नको असलेले सामान तेथेच सोडून नाखिंदच्या शोधात बाहेर पडलो. हाती असलेला मॅप आणि काही फोटो यांच्या मदतीने नाखिंद शोधायचे होते पण सगळ्यात मोठा अडथळा होता तो धुक्याचा. जंगम मामांच्या घरामागील टेकडी चढुन उजव्याबाजुला खाली उतरलो. चांगल्या मळलेल्या पायवाटेने तासभरात एका छोट्याश्या वस्तीपाशी पोहोचलो. पुढील वाटचालीसाठी आम्हाला सोबत करायला एक भू-भू बरोबर निघाले. रविवारची सुट्टी गप घरी बसून घालवणे त्यालाही पटत नव्हते, मग लगेच त्याचे नामकरण 'वाघ्या' असे झाले. त्या वस्तीच्या मागील बाजूची पायवाट पकडून डाव्याबाजूची टेकडी चढलो. आता मात्र समोर पसरलेले रायरेश्वरचे अफाट पठार धुक्यात हरवून गेलेले आणि पायाखाली असंख्य ढोरवाटा. नक्की कुठली वाट पकडायची याचा अंदाज घेण्यातच वेळ खर्ची पडु लागला, त्यामुळे वेगही मंदावला. तब्बल दोन तास तंगडतोड केल्यावर थोडेसे उजव्या हाताला वळल्यावर वाटेत शेंदुर फासलेले दगड दिसले, त्यामुळे वाट बरोबर आहे असा दिलासा तर मिळाला. पण पुढे जाऊन ती वाट डाव्याबाजूच्या जंगलात शिरली. मळलेली पायवाट होती म्हणून तीच पकडून आम्ही देखील त्या जंगलात शिरलो. जंगल संपल्यावर आम्ही डाव्याबाजूच्या कड्यावर येऊन पोहोचलेलो. समोर पसरलेली खोल दरी आणि परिसर धुक्यात हरवलेला. डावीकडची वाट पकडून कड्यावरुनच पुढे निघालो. खरेतर आम्ही परत रायरेश्वरच्याच दिशेला परत निघालेलो, पण धुक्यातून वाटा शोधताना दिशाभ्रम झालेला त्यामुळे लक्षातच नाही आले. दरीत झेपवणाऱ्या धबधब्यापाशी बसून तिघांनीही जेवण उरकले. जेवण झाल्यावर वाघ्या धबधबा ओलांडून निघुन गेला. आम्हीमात्र मॅपवर आमचे लोकेशन, नाखिंद आणि रायरेश्वर मंदिर यांचा ताळमेळ बसवत निरर्थकपणे बसलेलो. बरेच अकलेचे तारे तोडूनही कुठलाच हिशोब जुळत नव्हता आणि धुकेहि हटायचे नाव घेत नव्हते. शेवटी परत मागे जाऊन वाट शोधण्याचे ठरवले. मागे फिरलो खरे पण जिथुन आलो ती वाट पण मिळेना. शेवटी स्वतःच नव्या वाटा बनवत जंगलात शिरलो. घड्याळाचे काटे भरभर पुढे सरकत होते आणि आमची वाट मात्र जंगलातील झाडा-झुडपात हरवलेली. पण डोके शांत ठेवून वाट शोधण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुदैवाने मोबाईलला रेंज असल्यामुळे आमचे लोकेशन पाठवल्यावर 'आम्ही रायरेश्वर मंदिरापासून १० कि.मी वर होतो आणि आमच्या उत्तर-दक्षिण बाजूस रायरेश्वर मंदिर आहे' हि माहिती मिळाली. एव्हाना नाखिंदचा विचार सोडून दिलेला, कंपासमध्ये दिशा जुळवून परतीची वाट धरली. जंगल तुडवून बाहेर आल्यावर एक छान मळलेली पायवाट मिळाल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण समोर आलेला ओढापार करुन परत एक घनदाट जंगल पुढे पसरलेले. आधीच्या अनुभवामुळे आलेले शहाणपण ध्यानात धरून परत माघारी फिरलो आणि दूसरी वाट शोधत निघालो तर परत एकदा कड़यापाशी येऊन पोहोचलो. थोडेसे नीट पाहता एकदम 'जोर का झटका धीरेसे लगा' असे झाले. कारण तब्बल तीन तास भटकुन आम्ही जिथे जेवलो त्याच जागी परत आलेलो. आता हसावे का रडावे हेच न उमजून जिथे होतो तिथेच बसकण मारली आणि आजची रात्र जंगलातच घालवावी लागणार याची मानसिक तयारी सुरु केली. खायचे भरपूर सामान आणि पावसाळयामुळे उपलब्ध असलेले मुबलक पाणी हे प्रश्न जरी सुटलेले तरी आदल्या रात्रीची तास-दोन तासाची झोप, जंगलात बिबट्या, साप आणि इतर प्राण्यांचा वावर असताना उघड्यावर जागुन काढावी लागणारी रात्र व पावसाची भीती हे सगळेच अस्वस्थ करत होते. त्यामुळे आमचा वाघ्या ज्या वाटेने गेला तसेच जायचे ठरवून निघालो. एक धबधबा पार करुन डोंगराच्या कडेकडेने चालत होतो. पुढे दुरवर पायवाट दिसत होती पण वाटेत आडवा आलेला धबधबा व त्यातील हिरवेगार शेवाळे अंगावर लपेटून बसलेली दगडी पाहिली. चुकून जरी पाय घसरला तर धबधब्या बरोबरच दरीत कोसळत मिळणारी जलसमाधि अटळ होती. नुसता विचार करुनच अंगावर काटा आला. तसेच मागे फिरून दरीकडे पाठ फिरवत पठार चढलो. वरती आल्यावर खालील बाजूस दिसणारा गोळेवाडी धरण, पांडवगड आणि दुरवर दिसणारा केंजळगड पाहून हायसे वाटले. दिशाभ्रम दूर झालेला. अजुन १० किलोमीटर अंतर कापायचे होते, पण पोटात कोकलु लागलेल्या कावळयांनी भुकेची जाणीव करुन दिली. मग जवळच्या ओढ्यापाशी बसून मस्त हादडून घेतले आणि परतीची वाट धरली. आकाशातील काळ्या मेघां बरोबरच दिशांचेही मळभ दूर झालेले, धुके बाजूला सारून आजुबाजुचा परीसर जागा होत होता, सकाळपासुन ज्या पठारावर पायपीट केलेली ते समोर उलगडत असता नजरेत सामावत नव्हते, इतक्या वेळ नि:शब्दपणे चालू असलेल्या वाटचालीला आता वाचा फुटलेली, पावलांनी वेग धरलेला आणि उरलेले अंतर झरझर सरत होते. वाटेत भेटलेल्या मामांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजुन बरोबर वाटेला लावून दिले. जंगम मामांच्या घरी पोहोचलो तेव्हा ६ वाजलेले. अवघ्या २ मिनिटांत हाती आलेल्या कोऱ्या चाहने दिवसभराचा शिणवटा झटक्यात दूर केला, त्यानंतर गरमागरम पिठल-भाकरी, चुलीवरून डायरेक्ट ताटात उतरलेली खेकड़ा भजी, झणझणीत चटणी आणि सोबतीला जंगम मामा-मामींचा प्रेमळ आग्रह..जणुकाही 'यांचसाठी केला होता इतका सगळा अट्टाहास' असे वाटू लागले. तिथेच मुक्काम करायचा मोह अनावर होत होता पण निघणे भाग होते म्हणून लवकरच परत भेटीचे आश्वासन देऊन निरोप घेतला. नाखिंद न गाठता आल्याची रुखरुख जरी मनाला बोचत असली तरी आम्ही मात्र रिकाम्या हाती थोडीच परतत होतो.. रायरेश्वराच्या पठारावरील मनसोक्त भटकंती, जंगलात आलेल्या अनुभवांची शिदोरी आणि रायरेश्वर मंदिराशेजारी राहणाऱ्या देवमाणसांचे अतोनात प्रेम या सगळ्या अनुभवांच्या समृद्ध खुणगाठीही आमच्या सोबत होत्याच की.


सागर

1 comment:

  1. दादा फार सुंदर लिहिलंय

    ReplyDelete