तिकोणा - सेल्फीचा निष्फळ प्रयत्न





धो-धो कोसळणाऱ्या पावसात भटकंतीचा आनंद काही वेगळाच. घरी बसून कंटाळा आला मग काय? रात्री १२ वाजता उद्या ट्रेकला जाऊन येतो हे सांगितले पहाटे वाजता घर सोडलेपण. एकटाच निघालो पण सोबतिला होता तो रौद्रतांडव करणारा पाऊस, सकाळची नीरव शांतता आणि माझ्या बुलेटची धड़धड़. एका अनोख्या तालावरच धुंद होत पौड कधी आले हेच कळले नाही.
'चहा' नावाचे उकळते पाणी घशाखाली उतरल्यावर हुड़हुडी जराशी कमी झाली पुढे निघालो. थेट 'तिकोणा' किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी लावली तेव्हा सकाळचे वाजले होते. इतक्या पहाटे धो-धो कोसळणाऱ्या पावसात तिकोण्याला पोचलेलो मी एकटाच वेडा होतो. तासाभरातच वरती पोहोचलो. मेघ पूर्णपणे काळ्या ढगांनी झाकोळून गेलेले, सूर्यनारायण देखील त्यामागे दडलेले त्यामुळे सगळीकडेच अंधारून आलेले. सोसाट्याचा सुटलेला भर्राट वारा आधीच भिजुन ओल्याचिंब झालेल्या अंगाला भीडून थंडी पार हाडांपर्यंत पोचवत होता. फार काळ थांबणे परवडणारे नव्हते. म्हणूनच वाऱ्यावर फडफडणाऱ्या भगव्याला नमन करुन परत निघालो. तिकोण्याच्या कातळात खोदलेल्या कोरीव पायऱ्या पावसाळ्यात फारच अप्रतीम दिसत होत्या. बरेच फोटो काढून झाले. एकटाच असल्यामुळे स्वतःचा एकही फोटो नव्हता. या पायऱ्यांपाशी एक तरी फोटो असावा असे वाटू लागले. मग सुरु झाला selfie काढायचा प्रयत्न. अनेक प्रयोग करुन बघितले पण पायऱ्या आणि मी एकत्र हे गणित काही केल्या जुळत नव्हते. कधी माझे फक्त डोकेच यायचे तर कधी फ़क्त डोके नसलेले धड. पायऱ्या फक्त नावालाच यायच्या. लोकं कसे काय सेल्फी काढतात इतके चांगले? हे काही उमजेना. सगळेच प्रयत्न निष्फळ ठरले. जाउदेत हा काही आपला प्रांत नाही..उगाच नको नादी लागायला. म्हणून निघालो..खाली आल्यावर भुकेची जाणीव झाली. जवळच्या हॉटेलात मस्तपैकी गरमा-गरम मिसळ आणि भजी यांची आर्डर दिली आणि फोटो बघत बसलो. सेल्फीचे मजेदार फोटो बघताना अचानक मी करत असलेल्या चुकेची जाणीव झाली...यूरेका..अरेच्चा मोबाईलला कॅमेरे असतात आणि सेल्फी काढताना पुढचा कॅमेरा वापरायचा असतो. नुकत्याच लागलेल्या शोधावर माझे मलाच हसु येत होते. जाउदे आता वेळ निघुन गेलेली परत फिरणेही शक्य नव्हते. मिसळ आणि भजी यांवर ताव मारून गप घरची वाट धरली. यानंतर मात्र सेल्फी काढण्याच्या भानगडीत आजपर्यंत पडलो नाही. काही गोष्टींपासून जरा दूर राहिलेलेच बरे.

सागर


3 comments: