अंकाई-टंकाई वरील मेजवानी - २६ डिसेंबर २०१३




चार-पाच दिवसांचा मोठा ट्रेक म्हणजे विंचवाच्या बिर्‍हाडासारखा छोटासा संसारच आपल्या पाठीवर घेऊन मनसोक्‍त भटकायचे. जे काही आठवेल आणि हाती लागेल असे हवे-नको ते सगळेच सामान पाठीवरील बोचक्यात कोंबून-कोंबून भरलेले. त्यातच भर पडलेली असते ते इकडून-तिकडून गोळा करुन
आणलेल्या सामानाची (जे परत कधीच जात नाही) आणि सगळी शिधा सामग्री. खायच्या बऱ्याचश्या गोष्टी तर 'हे घरी कोणी खात नाही..घेऊन जा ट्रेकला म्हणजे संपेल तरी' असे प्रेमाचे बोल ऐकवून खपवल्या जातात. इतके सगळे सामान घेतले तरी गरजेच्या वस्तु मात्र सोईस्कररित्या विसरल्या जातात. मग मात्र आहे त्यातच पुढचे चार दिवस भागवायचे आहेत या हिशोबने न सांगताच बचत खाते सुरु होते. आता पाच दिवसांच्या ट्रेकमधील पहिले चार दिवस तर अपार उत्साहाने इतके मंतरलेले असतात की देवाला सोडलेला पोळ जसा उंदाडत असतो तसेच स्वैरपणे भटकत असतो. एकतर इतकी मोठी सुट्टी, ट्रेकचा योग आणि सोबतीला मनाजोगे सवंगडी हे सगळेच फार मुश्किलीने जुळून आलेले असते. मग जरा दुरचीच डोंगररांग निवडलेली असते आणि रोज किमान दोन किल्ले तरी पाहून झाले पाहिजेत या अलिखित वचनाला स्मरून पायाला भिंगरी लावल्यासारखी सकाळी ऊठल्यापासूनच पळापळ सुरु होते ते रात्री स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला गुरफटून घेत झोपी जाईपर्यंत. अशा धावपळीत खायचे-प्यायचे भानही रहात नाही. घरून निघायच्या आधी 'सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा बिस्किट आणि रात्रीचे जेवण' असे सगळे साग्रसंगितपणे खायचे प्लॅनिंग करताना नाचवलेले कागदी घोडे आणि त्या हिशोबाने अथवा जरा जास्तीचेच घेतलेले सामान बॅगेत तसेच पडून राहते. दिवसभराचे खाणे हे 'भांडी कोण घासणार? पाणी फार गार आहे रे, खायचे बनवण्यापेक्षा वाचलेल्या वेळात अजुन एखादा किल्ला पाहून होईल, उगाचच पाणी वाया घालवायला नको' अशा एक ना अनेक पळवाटा काढून मॅगी अथवा डाळ-तांदळाच्या खिचड़ीवरच उरकले जाते. शेवटच्या दिवशी मात्र आणलेला शिधा घरी परत नेला तर लई शिव्या बसतील या भीतिपाई प्रत्येकाच्या बॅगेतुन बाहेर पडतो. तो इतका असतो की पुढचे ४-५ दिवसही आरामात सरतील. मग हाती असलेला रिकामा वेळ कामी लावण्याच्या उद्देशानेच सुरु होतो पंचपक्वानांच्या पंगतीचा बेत.
२०१३ डिसेंबर अखेर केलेली नाशिक प्रांतातील भटकंतीही अशीच होती. अंजनेरी, हरीहर, रावळ्या-जवळ्या, मार्कंडेय, सप्तश्रृंगी अशी मनसोक्‍त भटकंती करुन शेवटचा मुक्काम अंकाई-टंकाई वर होता. सकाळी सप्तश्रृंगीला नाष्टा केलेला, दुपारच्या जेवणचा अंकाई-टंकाईच्या पायथ्याला असलेली लेणि पाहतानाच विसर पडलेला. अंकाई-टंकाई किल्ले पहाताना इतके हरवून गेलेलो की संध्याकाळ कधी झाली हेच उमगले नाही. सकाळच्या नाष्टयानंतर साधे पारले-जी चे बिस्किटपण पोटात गेले नव्हते. त्यातच सकाळपासुन चालू असलेली पळापळ त्यामुळेच पोटात भुकेचे कावळे काव-काव करू लागलेले. सोबत आणलेला टेंट लावला आणि जेवणाच्या तयारीला लागलो. सगळ्यात पहिले टोमॅटोचे गरमा-गरम सूप पिले. एकीकडे बिर्याणीची (प्युअर व्हेज) तयारी चालू होती. बरेच तेल शिल्लक आहे हे लक्षात आल्यावर लगेचच पापड आणि भजी तळून झाले. सरतेशेवटी बिर्याणीचे पातेले गॅसवर चढवून निवांतपणे पहुडलेलो. पण असा निवांतपणा काही आमच्या नशिबी नव्हता. इतकावेळ आल्हाददायक वाटणाऱ्या वाऱ्याने असेकाही रौद्र रूप धारण केले की लवकरच आमचा टेंट आमच्यासकट उडून जाईल अशी लक्षणे दिसू लागली. मग सगळे सामान बाहेर काढून चौघांनी चार खाद्यांवर राम नाम म्हणत टेंटचे स्थलांतर केले. परत एकदा सामानाची मांडामांड झाली. एव्हाना बिर्याणीचा खमंग वास दरवळू लागलेला. रात्रीची नीरव शांतता, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, डोक्यावरती आकाशात टिमटीमणाऱ्या ताऱ्यांचे छप्पर व पुढ्यात आलेले गरमा-गरम बिर्याणी, तळलेले पापड आणि सोबतीला खेकडा भजी. आहाहा..काय बेत जुळून आलेला. दोन घास जरा जास्तच गेले पोटात.चला चार-पाच दिवसाची मनसोक्‍त भटकंती झालेली व आता घरी परतायची एक अनामिक ओढ लागलेली. पुढील भटकंतिचे प्लॅन बनवतच कधी डोळे मिटले हेच कळले नाही.

सागर

2 comments:

  1. प्युअर व्हेज :-(

    तेव्हढं सोडून बाकी पोस्ट मस्तच जमली.

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा...कोंबडी कापायला चाकू नव्हता आमच्याकडे :(

      Delete