वाघ्या



आजवर रायरेश्वरला अनेकदा भेट दिलेली, पण दरवेळेस मामांकडे पोटपूजा उरकून पठारावर भटकायला निघालो कि हे बेनं कुठून प्रकट होते हे देवच जाणे. एखादे झाड दिसो वा मोठा दगड लगेच एखाद्या वाघाप्रमाणे आपली सीमा संरक्षित करण्यासाठी मागचा पाय वर करण्यात अजिबात हयगय न करण्याच्या सवयींमुळेच याचे नाव 'वाघ्या' ठेवले, पण दिल्या हाकेला याने आजवर कधीही दाद न देता कायमच दुर्लक्ष केले.

पहिल्यांदा रायरेश्वरला भेट दिली तेव्हा पावसाळा होता आणि दाट धुक्यात दिशाभूल झाल्यावर याने दुपारचे जेवण उरकल्यावर 'यांची लक्षणे काही ठीक दिसत नाहीत' हे उमजून आम्हाला धुक्यात तसेच सोडून गावाकडे पोबारा केला. तब्बल तीन तास दाट धुक्यात वाट शोधत वणवण केल्यावर शेवटी जेथे जेवण केले तेथेच पोहोचलो व याने पकडलेली वाट धरून गाव गाठले. पण दुपारच्या जेवणात वाघ्याला खाऊ घातलेल्या ब्रेडला तो पुरेपूर जागला व नंतरच्या प्रत्येक भेटीत साथ देण्यासाठी स्वखुशीने हजर राहिला. नंतरच्या भेटीत तर याने आपल्या जोडीदारालाही सोबत आणलेले, त्यावेळेस तर इतर कुठल्याही कुत्र्यांसारखे चाळे न करता दाखवलेला जंटलमनपणा तर दाद देण्यासारखा होता.
यावेळेसही नाखिंदच्या शोधात मामांकडे कोरा चहा पिऊन एकटाच निघालो तर लगेच वाघ्या सोबतीला हजर. यावेळेस मात्र एकटाच आलेला, बहुतेक त्याचा ब्रेकअप झाला असावा. आधी सोबत राहणाऱ्या वाघ्याने नंतर मात्र आपला नेहमीचा खेळ सुरु केला. माझ्यापुढे पळत जाऊन एखादे सावली देणारे झाड शोधून जीभ बाहेर काढून दमसास घेत उभा राहणार आणि जवळ पोहोचल्यावर परत पुढच्या सावलीच्या शोधात पुढे धावणार. हा सारा खेळ सुरु असतो तो फक्त जंगल दिसेपर्यंतच, एकदाका गर्द झाडीने वेढलेले जंगल दिसलेकी गपगुमान शेपूट आपल्या दोन पायात घालून माझ्या पायात घुटमळणार. याची खरी सोबत होते ती म्हणजे घनदाट जंगलात, रणरणत्या उन्हात जरासा विसावा घ्यायला थांबले की. जिभल्या दाखवत निवांत शेजारी येऊन बसणार, मध्येच मांडीवर डोके ठेवून निवांत डुलकी काढणार. पण जराकुठे पानांवर सळसळ झाली की लगेच सावध होऊन कान टवकारणार. कर्णाप्रमाणे अचूक शब्दवेध घेत टकलावून एकाच दिशेला काय दिसते याचा वेध घेत बघत बसणार. काही धोका नाही याची खात्री झाली की परत निवांत होणार. यावेळेस तर मे महिन्यातील उन्हाच्या झळा सोसून अंगाची अगदी लाहीलाही झालेली. त्यातच भर म्हणजे जंगलात शिरताना पाण्याची एक बाटली कुठेतरी पडली. तब्बल तीन तास तंगडतोड झालेली, वाटेत तर पाण्याचा लवलेशही नव्हता. होतीनव्हती ती सगळी डबकी कोरडी पडलेली, पण बॅगेत असलेल्या एक बाटलीपाणी व एक बिस्कीटपुडा यावरच उरलेला सगळा दिवस अजीबात कुरबुर न करता  वाघ्याने अखेरपर्यंत साथ दिली. नाही म्हणायला बॅगेत मिळालेली लिमलेटची गोळीही होती, ती देखील वाघ्याला देऊ केली पण त्याने तोंडही न लावल्याने शेवटी मीच ती आपल्या तोंडात टाकली.
नेहमीप्रमाणेच गाव जवळ आले की वाघ्या जसा सकाळी प्रकट व्हायचा तसाच अचानक अंतर्धानही पावायचा. पण यावेळेस मात्र निरोप द्यायला अगदी पायऱ्यांपर्यंत आलेला. अखेरीस लवकरच परत भेटू या बोलीवर निरोप घेऊन त्याला परत धाडले आणि परतीचा प्रवास सुरु केला.

सागर


No comments:

Post a Comment