घाटवाटा - उपांड्याघाट ते मढेघाट १४ डिसेंबर २०१४



शुक्रवारी सकळीच आकाशात काळया ढगांचे पुंजके जमु लागले. डिसेंबर महिन्यातील भरदुपार अंधारून आली आणि दुपारच्या हलक्याश्या सरीने वरुणराजाच्या  अवकाळी आगमनाची चाहूल दिली. संध्याकाळी तर बळीराजाने थैमान मांडले होते. त्यामुळे राजगड ते तोरणा बेत पण रद्द झाला. रविवारी सकाळी उठून तोरणा तरी करावा असा विचार चालूच होता तेवढ्यात फोन खणखणला 'उपांड्याघाट बघायला चाललोय, फक्त ४ जणच जाउन दुपारपर्यंत परत येऊ, तू येणार का?'. बऱ्याच दिवसापासून वर्षांपासून या घाटवाटा करायचा विचार चालू होता, म्हणून अचानक चालून आलेली संधी कशी चुकवणार? क्षणार्धात होकार कळवला.
रविवारी सकाळी ६ वाजता निघणार होतो पण चारचे आठजण झालेले त्यामुळे वाट पाहण्यात एक तास खर्ची पडला. सरतेशेवटी 'विनायक, राहुल, मंदार, संजय, गणेश, विराट, ऐश्वर्या आणि मी' असे ८ जण सकाळी ७ वाजता सिंहगड रोडवरून निघालो. पाबेघाटात ढग व धुक्याचा अप्रतिम नजराणा व त्यातूनच डोकेवर काढणारे राजगड व तोरणा असे दृष्य अनुभवले. वेल्हयात नाष्टा करुन पुढे निघालो. केळदखिंड पार करून मढेगाव गाठले. 'गाड्या गावातच लावा, म्हणजे नीट राहतील' हे  गावकऱ्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले (परत आल्यावर कळले की एका गाडीतले पेट्रोल कोणीतरी काढले) व वाट विचारुन गाड्या तशाच पुढे दामटल्या. मढेघाटतील धबधब्याकडे जाताना डावीकडे एका शेडखाली गाड्या लावल्या व उपांड्याघाटाची वाट धरली. खिंडीत पोचल्यावर दिसणारे दृश्य लाजवाबच होते. डावीकडे दुरवर धुक्यातुन डोकावणारा वरंधाघाट व कैवल्यगड (कावळ्या), खालील बाजूस दिसणारी हिरव्यागर्द झाडित वसलेली गावे तर उजव्याबाजूस दिसणारा मढेघाट व त्या पलिकडिल गाढवकडा. सगळा परिसर न्याहाळतच खाली उतरायला सुरुवात केली. वाट चांगलीच रूळलेली आहे व सोबतीलाच पाण्याची पाइपलाइन त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण तासाभरातच कर्णवाडीत पोचलो. उजवीकडे जाणाऱ्या छोट्याश्या गाडीरोडने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर लागते. त्यापुढिल चार घरे सोडली की उजव्या बाजूला एक पाउलवाट वरती जाताना दिसते. तीच वाट मढे घाटातून वाहणाऱ्या धबधब्याच्या वाटेला मिळते. खरी वाट धबधब्याच्या वाटेच्या डाविकडून वरती जाते पण आम्ही धबधब्याच्या वाटेनेच वरती निघालो व हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचा अनुभव घेतला. वाटेतच जरावेळ विश्रांतीसाठी थांबल्यावर बॅगेतून फळे, ब्रेड, बटर असे जिन्नस बाहेर डोकावु लागले. ते पोटात ढकलुन वरती वाटेतीलच थंडगार पाणी पिले. धबधब्याच्या छोट्याश्या धारेखाली डोके भिजवल्यावर आत्मापण शांत झाला. त्यानंतरची अर्ध्या-पाउण तासाची खडी चढण मात्र चांगलीच दमछाक करणारी होती. सरते शेवटी मढेघाटाच्या माथ्यावर पोचलो. थंडगार वाऱ्याने धबधब्यातील तुषारांचा अंगावर शिडकाव होताच उरलासुरला शिणवटाही दूर झाला. चार तासांच्या छोट्याश्या ट्रेकची सांगता झालेली. गाड्या काढून परतीचा मार्ग धरला परंतु मुसळधार पावसात चिंब भिजत या घाटवाटा अनुभवायची रुखरुख मात्र तशीच मागे राहिली. त्यासाठी आता वर्षभर थांबण्याशीवाय गत्यंतर नाही.


सागर मेहता

No comments:

Post a Comment