वासोटा - सह्यवेडे ८,९ नोव्हेंबर २०१४



आमचे परममित्र विनायक बेलोसे व प्राची शिंदे ज्यांच्या बरोबर गेली ७-८ वर्ष स्वछंद भटकतोय. त्यांनी भटकंतीची आवड असणार्यांसाठी 'सह्यवेडे' हा ट्रेक ग्रुप सुरु केला. बऱ्याच वेळा ठरवूनपण यांसोबत जाणे जमत नव्हते. शेवटी मुहुर्त लागला तो गेल्या वर्षीच्या हरिश्चंद्रगड मोहिमेचा. तेथेच ओळख झाली ती यांचा तीसरा पार्टनर 'राहुल बुलबुले' याच्याशी आणि अजुन एक अवली कलाकार फ्रेंड लिस्टमधे सामील झाला. त्यानंतर मात्र सोबतीने बऱ्याच गड-वाटा पालथ्या घातल्यात. त्याचबरोबर 'सह्यवेडे' ग्रुपलापण उदंड प्रतिसाद मिळून वेगवेगळया मोहिमा यशस्वी करण्याचा धडाका चालू होता. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे नुकताच केलेला 'वासोटा' किल्ला.
वयवर्ष ६ ते ८२ सर्व वयोगटातील मिळून ७० हरहुन्नरी कलाकार सामील झाले होते आणि विशेष म्हणजे ज्या उत्साहाने ६ वर्षाचे पोर उड्या मारत गड चढत होते, तोच उत्साह, आनंद, कुतूहल ८२ वर्षाच्या आजोबांच्या चेहर्यावरपण होते. रात्रभर रंगलेला गप्पांचा फड, जुन्या-नवीन गाण्यांनी सजलेली अंताक्षरी, श्री. अरुण लोंढे काकांनी बाजावर (mouth organ) वाजवलेली व सोबतच सुरेल आवाजात गायलेली जुनी गाणी, लुप्त होत चाललेल्या मर्दानी खेळांचे ‘दांडपट्टा व लाठी’ शिवामृत सूर्यवंशीने दाखवलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक, वयाची सत्तरी पार केल्यावर नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करताना आलेल्या अनुभवांचे श्री. अशोक चौबळ यांनी केलेले कथन. सोबतीला वासोट्याच्या घनदाट जंगलवाटा, दूरवर खुणावणारी नागेश्वर, चांगदेव, रसाळ, सुमार, महिपतगडची डोंगररांग, भग्न वाडयाचे गतवैभवाची जाणीव करून देणारे अवशेष, घनदाट जंगलाच्या वेढ्यातुन डोकेवर काढणारा जुना वासोटा व कितीही डोळे विस्फारून पहिले तरी नजरेत न सामावणारा ‘बाबुकडा’.
सगळेच कसे एकदम फक्कड जमून आले. बऱ्याच वर्षांपासून करायचा राहून गेलेला वासोटा ट्रेक 'सह्यवेडे' ट्रेकर्समुळे एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.


सागर मेहता

No comments:

Post a Comment