सिंहगड - ८ फेब्रुवारी २०१५


रविवार सकाळी सिंहगड म्हणजे अनेक हवशे-नवशे लोकांची जणु झुंबडच असते. पंढरीच्या वारीप्रमाणे दर रविवारी न चुकता येणारे, कुणी फक्त फोटु-फोटु खेळायला आलेले, कुणी फिटनेससाठी अवजड बोचकी खांद्यावर बाळगत चालणारे, तर कुणी रमत-गमत गप्पा-गोष्टी करत चालणारे. इथे पहिल्या पाच मिनिटांत 'आता थोडे थांबुयात' म्हणणारे पण
भेटतात तर कुणी घरुन ६.५० ला निघून ६.५५ ची लोकल गाठायच्या हिशोबाने धावणारेपण भेटतात. कुणाला बिसलरी पाण्यात बनवलेले ताक हवे असते तर कुणाला पुणे दरवाज्यापाशी मिळणारे थंडगार लिंबु सरबत व सोबतीला तिखट-मिठ लावलेले काकडी-कैरी चाखायचे असते. पण या सगळ्यांचा उत्साहमात्र एकदम दांडगा. 'किती हा चढ' अशा सुरवातीच्या कुरबुरीवर एकदा मात केल्यावर पुढील वाटचाल एकदम सोपी होऊन जाते, त्यातच सोबतीला कोणी आजोबा हातात काठी घेऊन एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने चढताना पाहिलेकी नकळतच एक नवा जोश अंगी संचारतो आणि दुरवर दिसणाऱ्या पुणे दरवाज्यापाशी कधी येऊन पोचतो तेही कळत नाही.
आजची सिंहगडची वारीपण अशाच उत्साही वारकऱ्यांच्या सोबतीने पार पडली. खाली आल्यावर नेहमीच्या हॉटेलला सिंहगडच्या पायपीटीने बर्न झालेल्या कॅलरीजची भरपाई करावी म्हणून थांबलो. नेहमीप्रमाणेच 'आपण इथे का थांबतो?' असा प्रश्न पडला. हॉटेल तुडुंब भरलेले असो वा रिकामे पण मिळणाऱ्या सर्विसमध्येमात्र काहीच फरक पडत नाही. 'भूक लागली म्हणून काय झाले धरतील जरा दम अथवा भूक सहन होत नाही तर इतकेवर चढून जावेच कशाला?' असे काहीसे भाव चेहऱ्यावर बाळगत दोन-चार हाका मारल्यावर कोणीतरी समोर येऊन उभा ठाकतो. 'चहा व पोहे..आणि दोन्हीपण बरोबरच आण' नंतर चहासाठी ताटकळत थांबायला लागुनये म्हणून थोडा धुर्तपणा दाखवून केलेली ऑर्डर मख्ख चेहऱ्याने ऐकून पहिला वेटर आल्या पावली माघारी गेला तो काही परत फिरून आलाच नाही. सुमारे पंधरा मिनिटांनी दूसराजण रिकाम्या हातीच सामोरी आला 'हा बोला..काय आणु?'. आता मात्र आम्हीच मख्ख चेहऱ्याने 'पहिल्यांदा ऑर्डर घेणाऱ्याला धरून आण' हा राग गिळून परत एकदा जुनीच टेप वाजवली. मगमात्र थोड्या वेळाने फक्‍त पोहेच सामोरी आले. 'चहा?' या प्रश्नावर 'दोन मिनिटांत देतो' असे उत्तर देऊन समोरचा वेटर शून्य मिनिटांत किचनमध्ये पळाला. इथे आमचे पोहे खाऊन थोडावेळ गप्पा झाल्या तरी चहा काही येईना. 'सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी व्यक्ती म्हणजे ग्राहक' या उक्तिला अनुसरून बरेच आवाज देउनही कोणी लक्ष देईना. शेवटी किचन समोर जाऊन उभे राहिल्यावर 'चहा?' या प्रश्नाला 'आधी पोहे खाऊन संपले का?' असा उलट प्रश्न आला. हसावे का रडावे हेच कळत नव्हते. शेवटी अथक परिश्रमानंतर मिळालेला चहा ढोसला व घरची वाट धरली. 


सागर

No comments:

Post a Comment