दिवाळी


सर्वत्र दिसणारा रंगीबेरंगी आकाशदिव्यांचा लखलखाट, भल्यापहाटे सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नविन कपड्यांची घडी मोडून सर्वात आधी फटाके फोडायला जाण्यासाठी चाललेली धावपळ, मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत देवळात जाणे, 'चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे' अशा बहुरंगी फराळावर सर्व मित्रमंडळीं जमवून यथेच्छ ताव मारणे, जिथे बांधकाम चालू असेल तेथून माती-वीटा पळवुन आणून बनवलेला किल्ला, तो बनवताना सर्वांग चिखलाने माखल्यामुळे बसलेला ओरडा, दिवाळीतील गृहपाठाचा ससेमिरा चुकवून दुपारी रंगलेला पत्यांचा डाव, सुट्टीत सहकुटुंब केलेली एखादी सफर. 
अशा अनेक रम्य आठवणींनी मंतरलेला दिवाळीतील काळ, आता मात्र रोजच्या धावपळीच्या शर्यतीत कुठेतरी हरवून गेलाय. आता फक्त दिसतो तो चकचकीत ऑफिसच्या काचेतुन बाहेरील आकाशदिव्यांचा लखलखाट, पण त्यांचा प्रकाश काही माझ्यापर्यंत पोहचत नाही.

सागर मेहता

No comments:

Post a Comment