मोरगिरी - २९ नोव्हेंबर २०१५

मोरगिरी किल्ला 
मागच्यावेळेस सकाळी उठायचा कंटाळा केल्याने मोरगिरीचा ट्रेक तसाच राहून गेलेला त्यामुळे परत एकदा एकच दिवस मिळाल्यावर जवळच असलेल्या मोरगिरीचा परत एकदा बेत ठरला. मोरगिरी अर्ध्या दिवसात उरकल्यावर अजून काय करता येईल हे बघण्यातच रात्रीचे दोन वाजले, आता परत एकदा फक्त कागदी घोडेच नाचणार असे वाटत होते. म्हणूनच दोनेक तासांची झोप पण सावधच होती. पहिल्यांदा वाजलेल्या गजरालाच खाडकन जाग आली व त्यानंतरच्या प्रत्येक पाच मिनिटांनी वाजणाऱ्या गजरांचे कष्ट वाचवले. आळस झटकुन झटपट आवरून बाहेर पडलो. श्रद्धाला घेऊन निघाल्यावर हायवेला गरमागरम चहाने डोळ्यांवरील उरल्यासुरल्या पेंगेला पळवून लावले आणि ताम्हिणीकडे निघालो. 'पुणे-->पौड-->जवण-->अजिवली-->मोरवे-->मोरगिरी (६८ कि.मी) या मार्गे मोरगिरी करायचा होता.
मुळशी रोडला पहाटे पहाटे बोचऱ्या थंडीत फिरायला जाणारे बघुन फारच कौतुक वाटत होते, स्वतः सुर्यमुखी असल्याने जरा जास्तच. पहाटेच्या कोवळया सुर्यकिरणात न्हाऊन निघालेल्या तिकोनाचे दर्शन घेतले व त्याला बगल देऊन मोरवेची वाट पकडली. यथातथाच असलेल्या रस्त्याने पौडनंतरच वेगाला आवर घातलेला त्यामुळे जरा निवांतच वाटचाल सुरु होती. मोरवेत उत्तुंग दिसणाऱ्या तुंगचे दर्शन घेऊन मोरगिरीच्या पायथ्याशी असलेल्या घराशी गाडी लावली. चौकशी केल्यावर ते घर नसून ऑफिस असल्याने चहाची तल्लफ अपुरीच राहिली. नको असलेले सामान व डोके हाफिसात जमा करुन वाट विचारली आणि मोरगिरीकडे मोर्चा वळवला. घरासमोरूनच जाणारा कच्चा रस्ता जंगलातून एका धबधब्यापाशी नेऊन सोडतो. खरे तर रोड वरपर्यंत नेण्याचा प्रयत्न फेल जाऊन पावसामुळे सगळी दगडी खाली वाहून आल्याने नाळेचा रस्ता झालेला. तो पार करुन पठारावर आलो व भुकेची जाणीव झाली. मस्तपैकी सावली पकडून पोटपूजा उरकली आणि पुढे निघालो. जंगलाला बगल देत मोरगिरीच्या डाव्या बाजुकडे निघालो. पुढे एक कच्चा रस्ता जंगलात तर एक सरळ जात होता आणि आजुबाजूस विस्तीर्ण पठार. थोडा शोध घेतल्यावर दोन वाटा मिळाल्या. एक मोरगिरीच्या डावीकडील बाजुने वर जात होती तर दुसरी उजवीकडे जंगलात जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने निघुन मोरगिरीच्या साधारण मधुन वरती जात होती. 

जंगलवाटा
जंगलात शिरणारी वाट जास्त रुळलेली होती म्हणून ती धरली तर तिही मोरगिरीच्या डावीकडे चाललेली. फारच डावीकडे जातोय असे वाटू लागल्याने कारवीतुन सरळ वरती चढण्याचा निर्णय घेतला. काटेरी झुडपांशी व पायाखालील घसरणाऱ्या मुरुमाशी तब्बल अर्धा तास झुंजल्यावर मोकळयावर आलो. मोरगिरीच्या डाव्या धारेवरुन जाणारी रुळलेली वाट मिळाली. आम्ही जर कारवीत न शिरता सरळ गेलो असतो तर कष्ट कमी पडून बरोबर वाटेने वर पोहोचलोही असतो, पण न चुकता ट्रेक करण्यात काय मजा? दहा मिनीटांतच जाखमाता मंदिरापाशी पोहोचलो. 

जाखमाता मंदिर
बॅगा तिथेच ठेवून जरा दम खाल्ला व वरती जायला निघालो. एक छोटासा रॉकपॅच चढून जायचे होते, पण खाली दिसणारी दरी बघून डोळे फिरत होते. थोडे प्रयत्न केल्यावर एक चांगला होल्ड मिळाला. त्यावर भरवसा ठेऊन वरती चढलो. वरील पायऱ्यांवर मुरूम जमा झालेला, त्यावरून तोल सांभाळतच गडमाथा गाठला.

मोरगिरीचा रॉकपॅच

मोरगिरीचा रॉकपॅच
थंडगार वारा उन्हाचा तडाखा जाणवू देत नव्हता. पवनेचा जलाशय, तुंग, तिकोना, कोरीगड असे किल्ले व आजुबाजूचा परीसर न्याहाळून वरच्या टाक्यातील हिरवेगार पाणी पिले आणि खाली निघालो. 

तुंग किल्ला
कोरीगड किल्ला
तोपर्यंत अमेय त्याच्या सोबतीने दहा जणांना घेऊन रॉकपॅच चढत होता. वनवे असल्यामुळे सगळे वरती येईपर्यंतचा वेळ गप्पागोष्टी करण्यात घालवला. परत एकदा कसरत करत मंदिरापाशी पोहोचलो. सावलीची जागा नसल्याने खालील जंगलातच पोटपुजा उरकण्याचा बेत आखला, त्यामुळे बॅगा घेऊन खाली निघालो. चांगली रुळलेली वाट मिळाल्याने कारवीचा त्रास न होता खाली पोहोचलो व पठार गाठले. मस्तपैकी सावलीची जागा बघून "ब्रेड, अंडी व गुळपोळी' खाल्यावर जरा बरे वाटले. गप्पागोष्टी करत परत गाडीपाशी पोहोचलो तेव्हा दोन वाजलेले. "तुंग - तिकोना' हे किल्ले बऱ्याचदा केल्याने कळंब गावाजवळील 'अनघाई किल्ला' व आजुबाजूच्या घाटवाटा तैलबैल जवळील पठारावरून बघायचे ठरवले म्हणून गाडी काढून माजगावकडे निघालो. वाटेतच कोरीगडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पेठ-शहापूर'मध्ये सकाळची चहाची अपूर्ण राहिलेली तल्लफ पुर्ण केली व माजगाव गाठले. गावात शिरणारा गर्द झाडांच्या कमानीतील रस्ताच दिलखुश करून गेला. एका ठिकाणी गाडी लावून चौकशी करायला गावात शिरलो तर एकच बाप्या सापडला. "लई उशीर केलात तुम्ही, कड्यावर जायलाच दीड-दोन तास लागतील, त्यामुळे यायच्या वेळी अंधार होईल. पुढच्या येळेस सकाळी लवकर या, मंग जाऊ आपण " असे सांगून आमची बोलावणी केली. पण वाट नक्की कुठून आहे? कशी आहे? हे विचारताना अजून थोडे पुढे गेल्यावर एक घर आहे तिथवर गाडी जाईल हे कळले. काय करायचे? याचा विचार करतच गाडीपाशी आलो. पुढील घरापाशी जाऊन तर बघू म्हणून गाडी काढत होतो तर श्रद्धाला छोट्याश्या दुकानात "बॉबी" दिसल्या. "आया हु तो कूछ तो लेके हि जाऊंगा" म्हणत लगेच त्यांची खरेदी झाली. 


                  बॉबी 
थोडेसे पुढे गेल्यावर उजवीकडे एक घर होते तिकडे गाडी लावली. घरात फक्त महिलामंडळ असल्याने वाट घरामागुन जाते पण किती वेळ लागेल हे माहिती नव्हते. एक बॅग जमा करुन आम्ही वाटेला लागलो. लवकर घाटमाथा गाठायचा होता म्हणून पायांनी गती घेतली. पायाखालील पायवाट हरवल्यावर शोधण्याचे कष्ट न घेता नवीन वाट काढत अर्ध्या तासातच घाटमाथा गाठला. समोर अप्रतीम असा नजराणा होता. हिरव्यागर्द झाडीत दडलेल्या अनेक घाटवाटा अनघाईकडे उतरत होत्या, डोंगररांगेच्या शेवटी अनघाई किल्ला पायथ्याशी असलेल्या जंगलातून वर उठत दिमाखात उभा होता तर त्याच्या पलीकडे दिसत होते ते अनघाईच्या पायथ्याशी असलेले कळंब गाव. 

अनघाई किल्ला व कळंब गाव

                       अनघाई किल्ला
अनघाईकडे उतरणाऱ्या घाटवाटा
भर्राट वारा व खालील नजारा बघताना सगळा शिणवटा दुर झाला. धबधब्याच्या वाटेतील नितळ पाणी पोटभर पिल्यावर जीवालाही थंडावा मिळाला. पाय निघत नव्हता पण लवकर परत फिरणे भाग होते म्हणून निघालो. बॅग घेऊन गाडी ताम्हिणीतील निवे फाट्याकडे वळवली. वाटेत तिन्हीसांजेला अवकाशातील तांबूस रंगाच्या पटलावर तैलबैलचे कातळकडे खुलुन दिसत होते. 

तैलबैलचे कातळकडे
घनगड किल्ला व 'नवरा-नवरी-करवली' सुळके अंधारात गुडुप होत होते. हवेतील बोचरा गारठाही वाढू लागलेला. निवे पर्यंतचा खाचखळ्ग्याच्या रस्त्यावरील कसरत पार पडल्यावर पुढील भटकंतीच्या विचारां बरोबरच चाकांनीही गती पकडली.

सागर

पुणे-->पौड-->जवण-->अजिवली-->मोरवे-->मोरगिरी-->घुसळखांब-->पेठ शहापुर-->माजगाव-->साल्तर-->भांबर्डे-->निवे-->ताम्हिणी-->मुळशी-->पुणे (१८६ कि.मी)

2 comments: